दास यांची नितीशकुमारांवर टीका

बिहारमध्ये करण्यात आलेल्या दारूबंदीचा मुख्यमंत्री नितीशकुमार हे प्रतिस्पध्र्याविरुद्ध राजकीय हत्यार म्हणून वापर करीत आहेत, असा आरोप झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी केला आहे.

बिहारमधील दारूबंदी म्हणजे दुसरेतिसरे काही नसून केवळ नौटंकी आहे आणि त्याचा नितीशकुमार राजकीय हत्यार म्हणून वापर करीत आहेत, असे दास म्हणाले.

बिहारमध्ये दारूबंदी करण्यात आल्यानंतर पश्चिम बंगालमधून मोठय़ा प्रमाणावर बिहारमध्ये दारूचा बेकायदेशीर व्यापार सुरू झाला आहे. असे असतानाही नितीशकुमार हे ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमध्ये दारूबंदी करण्यास सांगत नाहीत, असेही दास म्हणाले.

नितीशकुमार हे भाजपशासित राज्यांचा दौरा करून तेथे दारूबंदी जाहीर करण्याची मागणी पंतप्रधान मोदी यांच्याकडे करतात, मात्र ते पश्चिम बंगालला का जात नाहीत. बिहारमध्ये दारूबंदी करण्यात आल्यानंतर तेथे गांजा सेवनात वाढ झाली आहे, असा आरोपही दास यांनी केला.