पाकिस्तानच्या हद्दीत भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी समर्थन केले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या अडीच वर्षात पहिल्यांदाच पंतप्रधान काम करतात हे दाखवणारी कृती केली आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे सध्या किसान यात्रेनिमित्त सभा घेत आहे. देवरिया ते दिल्ली ही किसान यात्रा असून शुक्रवारी राहुल गांधींची यात्रा बुलंदशहरमध्ये दाखल झाली. बुलंदशहरमधील एका सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिल्यांदाच जाहीर पाठिंबा दिला. मी आणि काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदींच्या कारवाईचे समर्थन करतो, सर्जिकल स्ट्राईकच्याबाबतीत आम्ही मोदींच्या पाठिशी आहोत असे गांधींनी जाहीर केले.  गेल्या अडीच वर्षात पहिल्यांदाच मोदींनी पंतप्रधान कृती करतात हे दाखवले,  या निर्णयासाठी मी त्यांचा आभारी आहे असे त्यांनी सांगितले. पंंतप्रधान जेव्हा त्यांच्या पदासारखे काम करतात तेव्हा मी त्यांचे कौतुक करतो अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी उरी येथे केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने गुरुवारी पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. या कारवाईनंतर सुषमा स्वराज यांनी स्वतः सोनिया गांधी यांना या घटनेची संपूर्ण माहिती दिली. यानंतर सोनिया गांधी यांनीदेखील आम्ही सर्जिकल स्ट्राईकच्या बाबत केंद्र सरकारसोबत आहोत, सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानला योग्य तो संदेश मिळाला आहे असे सोनिया गांधी यांनी म्हटले होते.