राजस्थानातील बिष्णोई समाज हा पर्यावरण प्रेमी म्हणून ओळखला जातो. झाडांच्या कत्तली आणि प्राण्यांचे संरक्षण करण हा ते आपला धर्म मानतात. या बिष्णोई समाजाला आपल्या या धर्माचं पालन करणारा एक नवा तरुण हिरो मिळाला आहे.

मुकेश बिष्णोई असं या सतरा वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो जोधपूर-जैसलमेर हायवेवरील भालू राजवा (केटू) या गावचा रहिवासी आहे. यापूर्वी मुकेशला असं कधीही वाटलं नसेल की लोक त्याला सोशल मीडियातून सर्च करतील किंवा त्याच्याशी बोलतील. त्याचं कारणंही तसंच आहे. बिष्णोई समाजासाठी चिंकारा हरीण हे तर एखाद्या पोटच्या लेकराप्रमाणं असतं आणि याच चिंकाराची रविवारी काही शिकाराऱ्यानी शिकार केली. या शस्त्रधारी शिकाऱ्यांशी मुकेशनं न घाबरता दोन हात केले, त्यांना तो एकटाच भिडला. त्याच्या या साहसाबद्दल अखिल भारतीय बिष्णोई महासभेनं त्याला प्रमाणपत्र देऊन गौरवलं आहे.

देशभरात सध्या करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आलं आहे. या काळात घरातून बाहेरच पडता येत नसल्यानं चोरट्या शिकारींचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळेच चिंकाऱ्याच्या संरक्षणासाठी रात्रीच्यावेळी जंगलांमध्ये गस्त घालणाऱ्या मुकेश आणि त्याच्या पंधरा जणांच्या टीमसाठी ही अधिकच जबाबादारीची बाब होती. आपल्या कामगिरीबाबत सांगताना अकरावीत शिकणारा मुकेश म्हणाला, “लॉकडाउनपूर्वी आमची टीम आठवड्यातून दोनदा रात्रीची गस्त घालत होती. मात्र, लॉकडाउननंतर आम्ही आठवड्याचे सातही दिवस रात्रीची गस्त घालीत आहोत. झाडं आणि प्राण्यांचं रक्षण करणं हाच आमचा धर्म आहे.”

मुकेश सांगतो, “रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मी आणि माझा सहकारी पुखराज थोडावेळ पाणी पिण्यासाठी भालू अनुपगड येथील सरकारी शाळेत गेलो. त्याचवेळी आम्ही गोळीबार झाल्याचा आवाज ऐकला, त्यानंतर आम्ही तत्काळ आमच्या जीपच्या दिशेनं धाव घेतली तर आमच्या समोरच चार बंदुकधारी शिकारी मृत चिंकारा घेऊन निघाले होते. आम्हाला पाहिल्यानंतर ते पळायला लागले. नेमकी त्याचवेळी आमची जीप रेतीमध्ये रुतून बसली. त्यामुळे मी जीपमधून उडी टाकून त्यांचा पाठलाग सुरु केला. त्यांपैकी एकानं माझ्यासमोर बंदुक धरली पण ती त्यानं लोड केली नव्हती. त्यानंतर मी त्याच्याअंगावर धाव घेतली आणि आमच्यामध्ये झटापट सुरु झाली. त्यानंतर इतर दोघांनी चिंकाराला घेऊन पुन्हा पळायला सुरुवात केली आणि इतर लोक माझ्यावर हल्ला करायला परत आले.”

“यांपैकी एकानं मला धक्का दिला त्यामुळं माझा तोल जाऊन मी रेतीमध्ये पडलो. झटापटीत मी त्या शिकाऱ्याची बंदुक हिसकावून घेतली. त्यानंतर ते अंधाराकडे पळून गेले. त्यानंतर मी माझ्या सहकाऱ्यांना आमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवरुन मेसेज केला. त्यानंतर पुढील दहा ते बारा मिनिटांत १०० गावकरी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर चिंकाराच्या रक्ताच्या डागाचा माग घेत ते घटनास्थळापासून ७ किमी दूर असलेल्या चमू गावापर्यंत पोहोचले. दरम्यान, त्यांनी वनकर्मचाऱ्यांना देखील माहिती दिली होती. त्यानंतर ते देखील घटनास्थळी पोहोचले मात्र तोवर शिकारी पळून जाण्यात यशस्वी ठरले.”

शिकाऱ्यांनी दुसऱ्या वेळेस अशा प्रकारे ओपन फायर केल्याचं मुकेशनं सांगितलं. गेल्यावेळी त्याच्या मित्रावरही शस्त्रधारी शिकाऱ्यांनी गोळी झाडली होती. दरम्यान, मुकेशला शस्त्रधारी शिकाऱ्यांची भीती वाटली नाही का? याबाबत विचारले असता त्याने नाही म्हणून उत्तर दिले. उलट, चिंकारांचे रक्षण करणे हाच आमचा धर्म असल्याचं त्यानं सांगितलं तसंच यासाठी संपूर्ण समाज माझ्या पाठीशी असल्याचंही तो म्हणाला. मुकेश हा त्याच्या भावंडांमध्ये सर्वात लहान मुलगा आहे.

वन्यप्राणी संरक्षण कायदा, १९७२ नुसार, चिंकारा हा लुप्त होत असलेल्या प्राण्याच्या यादीत मोडतो. त्यामुळे शिकारी त्याची शिकार करण्यात जास्त उत्सुक असतात. कारण त्यांना त्याचे चांगले पैसे मिळतात. तर दुसरीकडे राजस्थानातील बिष्णोई समाज हा प्राणी आणि झाडांचं रक्षण करणं हा आपला धर्म मानतात.