राजस्थानच्या कोटा शहरातील शासकीय शाळेत एक भयंकर घटना घडली आहे. येथील शासकीय प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने पाच वर्षांच्या विद्यार्थिनीला जबर मारहाण केली आहे. या मारहाणीत विद्यार्थिनीचा हात मोडला आहे. दरम्यान, पोलिसांनी या शिक्षकाला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, जखमी विद्यार्थिनी खेडारसूलपूर येथील शाळेत पहिल्या इयत्तेत शिकते. चिमुकलीचा हात मोडेपर्यंत तिला झालेली मारहाण पाहून तिच्या वडिलांनी शिक्षकाविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी मोहम्मद सत्तार नावाच्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला तसेच शनिवारी सायंकाळी त्याला अटक केली.

दरम्यान, या प्रकरणाची माहिती देताना सर्कल अधिकारी (कोटा ग्रामीण) गगेंद्र सिंह म्हणाले, आम्ही आरोपी शिक्षकाला अटक केली असून रविवारी त्याला न्यायालयासमोर हजर केलं जाईल. विद्यार्थिनीच्या वडिलांनी आरोप केला आहे की, त्यांची मुलगी ज्या शाळेत शिकते, तिथले शिक्षक मोहम्मद सत्तार यांनी त्यांच्या मुलीला इतकी मारहाण केली आहे की या मारहाणीत मुलीचा हात मोडला आहे. दरम्यान, पोलिसांनी तक्रार प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास केला आणि आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.

हे ही वाचा >> Video : वडील चार महिन्यापूर्वी गेले; घर सांभाळण्यासाठी फूड स्टॉल चालवतो दहावीतला विद्यार्थी, व्हिडीओ पाहून व्हाल भावूक

कॅथून पोलीस ठाण्याचे सर्कल पोलीस निरीक्षक हरलाल मीना म्हणाले, चिमुकल्या मुलीला मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात भारतीय दंड संहिता आणि एससी-एसटी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्तारने शाळेत विद्यार्थिनीला मारहाण केली तसेच तिचा हात मुरगळला. यादरम्यान तिच्या हाताची हाडं मोडली आहेत. आम्ही सध्या या प्रकरणाचा तपास करत आहोत. तसेच लवकरच या शिक्षकाला न्यायालयासमोर हजर करू.