आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे माजी महासंचालक आणि राम जन्मभूमीच्या ठिकाणी उत्खनन करणारे ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ बी. बी. लाल यांचं आज निधन झालं. अयोध्येतील वादग्रस्त ठिकाणी प्राचीन काळी राम मंदिर होतं, हे सिद्ध करण्यात बी. बी. लाल यांनी त्या ठिकाणी केललं उत्खनन महत्त्वाचा आधार ठरलं होतं. केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भात ट्वीट करत बी. बी. लाल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बी. बी. लाल यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

बी. बी. लाल यांनी राम जन्मभूमीच्या ठिकाणी उत्खनन करून त्याचा सखोल अभ्यास केला होता. त्यांच्या अभ्यासातील निष्कर्षांच्या आधारेच वादग्रस्त जमिनीवर पूर्वी राम मंदिर होतं, हे सिद्ध करण्यास मदत झाली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने बाबरी मशीद प्रकरणी ऐतिहासिक निकाल देत त्या ठिकाणी राम मंदिराची उभारणी करण्यासंदर्भात निकाल दिला होता.

तसेच, मुस्लीम समाजालादेखील मशिदीसाठी अयोध्येतच दुसरीकडे जमीन देण्याचाही निर्वाळा न्यायालयाने दिला होता.

इतिहास संशोधनात बी. बी. लाल यांच्या अभ्यासाची मोलाची मदत!

बी. बी. लाल हे १९६८ ते १९७२ दरम्यान आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे महासंचालक होते. हडप्पा संस्कृती आणि महाभारताशी संबंधित ठिकाणांच्या उत्खननासाठी त्यांनी सखोल अध्ययन केलं होतं. त्यांनी युनेस्कोच्या अनेक समित्यांवर देखील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या होत्या. २००० साली त्यांना पद्मभूषण, तर २०२१ साली त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.