प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी देशभरात वाढत्या असहिष्णूतेवर चिंता व्यक्त केली आहे. असहिष्णूता हा एक शापच असून ही असहिष्णूता कुठून येते हेदेखील सर्वांना माहित आहे. पण प्रत्येकाला या देशातून असहिष्णूता नष्ट व्हावी असे वाटत असल्याचे टाटा यांनी म्हटले आहे.

मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथे शिंदे शाळेच्या ११९ व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात रतन टाटा उपस्थित होते. या कार्यक्रमात काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी असहिष्णूतवर भाष्य केले. देशभरात आज असहिष्णूतेचे वातावरण आहे. प्रत्येक व्यक्तीला सांगितलं जात आहे की त्याने काय खावे, कोणते कपडे घालावेत  आणि काय ऐकावे. मतभेदांवर कारवाई करणे हे समाजाच्या प्रगतीच्या विरोधात आहे असे शिंदे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिंदे म्हणाले तुम्ही विजयी व्हावे असे आम्हाला वाटते. तुम्ही विचारवंत व्हायला पाहिजे. वादविवाद, विचारविनिमय आणि असहमती हीच सभ्य समाजाची ओळख आहे असे शिंदे यांनी नमूद केले.

शिंदे यांच्या भाषणानंतर रतन टाटा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. टाटा यांनी शिंदे यांच्या विधानाशी सहमती दर्शवली. ‘शिंदे यांनी असहिष्णूतेसंदर्भात मत मांडले. पण असहिष्णूता हा एक शाप आहे आणि आपण हे गेल्या काही काळापासून बघत आहोत असे टाटा म्हणालेत. आपल्याला एक असे वातावरण हवे की आपण सर्वांसोबत प्रेमाने राहावे, त्यांना बंधक बनवू नये, एकमेकांसोबत सद्भावनापूर्वक वातावरणात आपण राहायला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. हजारो लाखो लोकांना आज असहिष्णूता मुक्त देश हवा आहे याकडे टाटा यांनी लक्ष वेधले.