चीनमध्ये करोना विषाणूने रविवारी १०५ बळी घेतले असून एकूण मृतांची संख्या आता १७७० झाली आहे. दरम्यान हुबेईत अधिकाऱ्यांनी संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी अनावश्यक सार्वजनिक ठिकाणे बंद केली असून वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत.

करोना विषाणूचा सर्वाधिक फटका हा हुबेई प्रांत व त्याची राजधानी असलेल्या वुहानला बसला आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे की, एकूण २०४८ नवीन रुग्ण सापडले असून सीओव्हीआयडी १९ विषाणूने संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ७०५४८ झाली आहे.

हुबेई प्रांतात १०० बळी गेले असून हेनानमध्ये तीन तर ग्वांगडाँगमध्ये दोन जण मरण पावले आहेत. प्रकृतीत सुधारणेमुळे १०८४४ रुग्णांना घरी जाऊ देण्यात आले. आरोग्य आयोगाने म्हटले आहे की, आणखी ७२६४ जणांना लागण झाली असण्याची शक्यता आहे. रविवारी हाँगकाँगमध्ये ५७ निश्चित रुग्ण  सापडले असून एकाचा आधीच मृत्यू झाला आहे. मकाव १० व तैवान २० या प्रमाणे रुग्णांची संख्या असून तैवानमध्ये एकाचा आधीच मृत्यू झाला आहे.

हुबेई प्रांतात ५ कोटी लोकसंख्येची अठरा शहरे २३ जानेवारीपासून बंद आहेत. त्यांनी विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वाहतुकीवर कडक निर्बंध लागू केले असून अनावश्यक सार्वजनिक ठिकाणे बंद केली आहेत. प्रांतिक सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, सर्वाची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. काही सार्वजनिक संस्थांचे काम सुरू झाले असून त्यांना कठोर उपाय राबवण्यास सांगण्यात आले आहे.

रविवारी रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे आरोग्य आयोगाने म्हटले आहे. वुहान येथे २८ जानेवारीला ३२.४ टक्के निश्चित रुग्ण होते त्यांचे प्रमाण आता १५ फेब्रुवारीला २१.६ टक्के झाले आहे अशी माहिती आरोग्य आयोगाचे प्रवक्ते मी फेंग यांनी दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे पथक

दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे बारा सदस्यांचे पथक चिनी अधिकाऱ्यांना मदत करीत आहे. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ तेथे काम करीत असून जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस अँधनोम घेब्रेयेसस यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांची म्युनिक येथील सुरक्षा परिषदेवेळी भेट घेतली.