Premium

अंदाज अधांतरीच! पाच राज्यांतील मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर 

राजस्थान, मध्य प्रदेशात भाजपला काठावर बहुमत; छत्तीसगड, तेलंगणमध्ये काँग्रेसच्या विजयाची शक्यता

Results of post poll tests in five states announced 
अंदाज अधांतरीच! पाच राज्यांतील मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज जाहीर झाले असून बहुतांश सर्वेक्षणांमध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. छत्तीसगडची सत्ता काँग्रेस कायम राखण्याचा अंदाज असून तेलंगणमध्ये बहुतेक सर्व संस्थांनी काँग्रेसला बहुमत दाखविले आहे. मिझोरममध्ये स्थानिक आघाडय़ांमध्येच चुरस रंगण्याची शक्यता आहे. मात्र चार मोठय़ा राज्यांमध्ये प्रचाराच्या काळात निकालाबाबत असलेली संदिग्धता मतदानोत्तर चाचण्यांनंतरही कायम राहिली आहे. आता रविवार, ३ डिसेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.  

७ नोव्हेंबर ते गुरुवार, ३० नोव्हेंबर या कालावधीत मध्य प्रदेश, राजस्थान (२०० जागा), तेलंगण (११९ जागा), छत्तीसगड (९० जागा) आणि मिझोरम (४० जागा) या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. यातील मध्य प्रदेशात भाजपची सत्ता असून राजस्थान व छत्तीसगड ही दोन राज्ये काँग्रेसकडे आहेत. तेलंगणमध्ये भारत राष्ट्र समितीचे सर्वेसर्वा के. चंद्रशेखर राव गेली १० वर्षे सत्तेत आहेत. मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजांनुसार राजस्थान व तेलंगणमध्ये सत्तांतराची शक्यता असून मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये सत्ताधाऱ्यांनाच पुन्हा संधी मिळू शकते. मिझोरममध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना फारशी संधी नसल्याचे चित्र आहे. तेथे सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) आणि नव्याने स्थापन झालेल्या झोराम पिपल्स मुव्हमेंट (झेडपीएम) यांच्यात चुरस आहे.

हेही वाचा >>>Exit Polls 2023 Result: कोण जिंकणार लोकसभेची सेमीफायनल? काय आहेत एग्झिट पोलचे अंदाज?

दरम्यान, मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजांवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. छत्तीसगडमध्ये बहुतांश संस्थांनी काँग्रेस व भाजपमध्ये अटीतटीची लढाई असल्याचे भाकित केले असले तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी काँग्रेस सत्ता कायम राखेल असे म्हटले असताना माजी मुख्यमंत्री व भाजप नेते रमणसिंह यांनी सत्तांतराचा दावा केला आहे. तेलंगणमध्ये बहुतेक सर्व सर्वेक्षणांमध्ये काँग्रेसला सत्तेचा अंदाज वर्तविण्यात आला असताना बीआरएस नेते के. टी. रामाराव यांनी आपल्या पक्षाला ७०पेक्षा जास्त जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला.

तेलंगणमध्ये ६४ टक्के मतदान

तेलंगण विधानसभेच्या ११९ जागांसाठी गुरुवारी ६३.९४ टक्के मतदान झाले. काही ठिकाणी वादावादीचे तुरळक प्रकार वगळता मतदान शांततेत पार पाडल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी विकास राज यांनी सांगितले. सुमारे २५०० उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

सत्ताधारी ‘बीआरएस’ आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत असून, भाजप आणि एमआयएम या पक्षांनीही ताकद लावली आहे. बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांमध्ये काँग्रेस सत्तासमीप असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Results of post poll tests in five states announced amy

First published on: 01-12-2023 at 03:20 IST
Next Story
Exit Polls 2023 Result: कोण जिंकणार लोकसभेची सेमीफायनल? काय आहेत एग्झिट पोलचे अंदाज?