नवी दिल्ली : स्वत:च्या नावाने किंवा पालकांपैकी एकाची मुलगी अथवा मुलगा म्हणून ओळखले जाण्याचा अधिकार हा प्रत्येकाच्या ओळखनिश्चितीसाठी मूलभूत असल्याचे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी एका सुनावणीदरम्यान नोंदवले.

एका विद्यार्थिनीने तिच्या १०वी आणि १२वीच्या ‘सीबीएसई’ गुणपत्रिकांवर पित्याचे नाव बदलण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नोंदणीच्या वेळी तिच्या पित्याचा मृत्यू झाला असल्याने तिने तिच्या काकांचे नाव दिले होते. ‘सीबीएसई’ने जारी केलेल्या प्रमाणपत्रांवर नोंदवलेले नाव तिच्या पित्याचे नाही याची नोंद घेत असल्याचे न्यायालयाने सांगितले.

हेही वाचा >>> ‘RBI बँक सरकारची चीअर लीडर’, माजी गव्हर्नकरकडून युपीए सरकारवर खळबळजनक आरोप

सार्वजनिक दस्तऐवजांवर याचिकाकर्तीच्या पित्याच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये काही फरक आहेत. असे असले तरी, नाव ही ओळखीची खूण असते आणि अशा प्रकरणांमध्ये पांडित्यपूर्ण नव्हे तर वास्तव दृष्टिकोन स्वीकारायला हवा असेही न्यायालयाने स्पष्ट केले. एखाद्याच्या नावाने ओळखले जाणे, तसेच अचूक नाव नमूद केलेल्या पालकांची मुलगी किंवा मुलगा म्हणून ओळखले जाणे, ही बाब प्रत्येकाच्या ओळखीसाठी मूलभूत आहे. त्यामुळे या प्रकरणी याचिकाकर्तीने केलेली विनंती खरी असेल तर स्वीकारली जाईल, असे न्या. सी हरी शंकर यांनी सांगितले. प्रादेशिक भाषेतून नावाचे इंग्रजीमध्ये रूपांतर केले जाते तेव्हा स्पेलिंगमध्ये फरक पडू शकतो ही बाबदेखील न्यायालयाने विचारात घेतली.