राफेल लढाऊ विमाने खरेदी प्रकरणावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने सरकारवर निशाणा साधत आहेत, गुरुवारी त्यांनी पुन्हा ट्विट करीत संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांच्यावर खोटे बोलल्याचा आरोप करीत हल्लाबोल केला. सीतारामन यांना राफेल मंत्री असे संबोधत त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या स्वदेशी विमानांची बांधणी करणाऱ्या कंपनीला राफेल विमानांच्या निर्मितीचा ठेका न दिल्याने राहुल गांधी यांनी ही टीका केली आहे.

राहुल गांधी म्हणाले, भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे काम करणाऱ्या आरएम अर्थात राफेल मिनिस्टर यांचा खोटेपणा पुन्हा उघड झाला आहे. एचएएलचे माजी प्रमुख टी. एस. राजू यांनी त्यांचं खोटं उघड केलं आहे. एचएएलजवळ राफेल बनवण्याची क्षमता नाही, असे वक्तव्य सीतारामन यांनी केलं होतं. त्यांचे हे वक्तव्य खोडून काढत यावर एचएएलकडे राफेल बनवण्याची क्षमता होती असे राजू यांनी म्हटले आहे. राजू यांच्या या दाव्याचा दाखला देताना राहुल यांनी सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

या राफेल डीलवरुन काँग्रेसने वारंवार मोदी सरकारवर टीका केली आहे. काँग्रेसने आरोप केला आहे की, मोदी सरकारने फ्रान्सच्या दसॉ कंपनीकडे ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदीचा जो करार केला आहे. तो खूपच अधिकच्या किंमतीला केला आहे.

दरम्यान, बुधवारी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने महालेखा परीक्षकांची (कॅग) भेट घेऊन राफेल लढाऊ जेट विमानांच्या प्रकरणी झालेल्या गैरप्रकारांबाबतचा अहवाल लवकर सादर करण्याची मागणी केली. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने कॅगला निवेदन सादर केले असून त्यात म्हटले आहे, की कॅगच्या अहवालामुळे राफेल जेट विमान खरेदीतील गैरप्रकार जाहीर होतील व सत्य समजेल. वरिष्ठ काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी कॅगच्या भेटीनंतर वार्ताहरांना सांगितले, की आम्ही राफेल प्रकरणातील जे गैरप्रकार आहेत त्याची माहिती निवेदनासोबत जोडली असून कॅग या प्रकरणी लगेच अहवाल तयार करील व तो संसदेत मांडला जाईल, अशी अपेक्षा आहे.