नरिमन पॉइंट-दहिसर मार्गाची अधिसूचना केंद्राकडून जारी
मुंबईवरील वाहतुकीचा भार काहीसा हलका करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या किनारपट्टी रस्त्याच्या (कोस्टल रोड) निर्मितीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या रस्त्याच्या निर्मितीसंदर्भातील अधिसूचना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने बुधवारी जारी केली. त्यामुळे आता या किनारपट्टी रस्त्याच्या निर्मितीप्रक्रियेला वेग येणार आहे. सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून रखडला होता.
नरिमन पॉइंट ते दहिसर यादरम्यानच्या ३५.६ किमी लांबीच्या या प्रस्तावित किनारपट्टी मार्गावर ९१ हेक्टर जागेवर हरितपट्टा उभारण्यात येणार आहे. या जागेचा बांधकाम व्यावसायिकांकडून दुरुपयोग होणार नसल्याची ग्वाही राज्य सरकारने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयास दिली होती. त्यानंतर या प्रकल्पातील मोठे अडथळे दूर झाले होते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात हा प्रकल्प रखडला होता. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ९ जून रोजी झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने किनारपट्टी रस्त्याच्या निर्मितीस तत्त्वत: मंजुरी दिली होती. पर्यावरणाचे संतुलन राखून मुंबईतील ९१ हेक्टर जमीन हरित क्षेत्र करण्यावर या बैठकीत चर्चा झाली होती. महत्त्वाचे म्हणजे समुद्राच्या भरतीच्या लाटा वाढणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना पर्यावरण खात्याने राज्य सरकारला केली आहे.

* प्रस्तावित किनारपट्टी मार्ग नरिमन पॉइंट ते दहिसरदरम्यान
* मुंबईतील सुमारे ६० टक्के वाहतूक पश्चिम द्रुतगती मार्गावरून
* किनारपट्टी रस्त्यामुळे हा वाहतूक भार कमी होणार
* मार्गादरम्यान ९१ हेक्टर जागेवर हरित पट्टा उभारण्यात येणार