‘आरएसएस’ फीड या नेटिझन्सना परिचित असणाऱ्या प्रणालीचा निर्माता तसेच इंटरनेट कार्यकर्ता अॅरॉन श्वाट्र्झ (वय २६) हा ब्रुकलीन येथे मृतावस्थेत सापडले. हॅकिंग प्रकरणात सुनावणीस सामोरे जाण्याच्या काही आठवडय़ांपूर्वीच त्याने आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येते. न्यूयॉर्क मेडिकल एक्झामिनर कार्यालयाच्या प्रवक्तया एलेन बोराकोवे यांनी सांगितले की, शुक्रवारी सायंकाळी त्याचा मृतदेह सापडला. श्वाट्र्झ याचे काका मायकेल वूल्फ यांनी सांगितले की, श्वाट्र्झ यांनी गळफास लावून घेतला. अॅरॉन यांची सर्जनशीलता, उत्सुकता, बुद्धिमत्ता, निस्वार्थी प्रेम, अन्याय स्वीकारण्यास विरोध हे त्याचे गुण म्हणजे जगाला मोठय़ा देणग्या आहेत. अमेरिकी न्याय खात्याच्या प्रवक्तया ख्रिस्तिना डिलोरियो-स्टर्लिग यांनी श्वाट्र्झ याच्या मृत्यूबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, पण त्याच्या कुटुंबीयांबाबत आदर व्यक्त केला.
त्याच्यासमवेत जो काळ व्यतित करायला मिळाला त्याबाबत आम्ही ऋणी आहोत. जे त्याच्या बाजूने उभे राहिले व जे चांगल्या जगाची त्याची कल्पना पुढे नेणार आहेत त्यांचेही आभारी आहोत, असे वूल्फ म्हणाले. जेस्टोर या ऑनलाइन अर्काइव्हमधून लाखो शैक्षणिक शोधनिबंध डाऊनलोड केल्याने त्याच्यावर हॅकिंगचा आरोप ठेवण्यात आला होता.
श्वाट्र्झ हा इंटरनेटवरील माहिती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता होता. गेल्या वर्षीच्या प्राथमिक सुनावणीत त्याने संगणक घोटाळा केल्याचा आरोप फेटाळला होता, पण त्याची संघराज्य न्यायालयातील सुनावणी पुढील महिन्यात सुरू होणार होती. वायर घोटाळा, संगणक घोटाळा या प्रकरणीही त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले होते. दोषी ठरला असता तर त्याला ३५ वर्षे तुरुंगवास व १० लाख अमेरिकी डॉलर दंड इतकी शिक्षा झाली असती, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या बातमीत म्हटले आहे.
श्वाट्र्झ हा इंटरनेटच्या काही निर्णायक क्षणांचा साक्षीदार होता. ऑनलाइन माहितीचा तो एक मोठा स्रोत आहे. स्वाट्र्झ हा नंतर स्टॅनफर्ड विद्यापीठात दाखल झाला, पण अवघ्या वर्षांतच तो तेथून बाहेर पडला. नंतर त्याने रेडिट या सोशल न्यूज वेबसाईटची निर्मिती केली होती व ती त्याने २००६ मध्ये प्रकाशक काँडे नॅस्ट यांच्याकडून विकत घेतली होती.
श्वाट्र्झ याने डिमांड प्रोग्रेस हा राजकीय कृतिगट स्थापन केला होता. काही वेळा त्याने कायदेशीर मर्यादांचे उल्लंघन केले होते. २०११ मध्ये त्याला संगणक घोटाळ्यात बोस्टन येथे अटक करण्यात आली.
मॅसेच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून ऑनलाइन कागदपत्रे चोरल्याचा त्याच्यावर आरोप होता.