खाकी हाफ पँटच्या जागी आता तपकिरी रंगाची पूर्ण विजार; राजस्थानातील प्रतिनिधी सभेत एकमुखाने निर्णय
खाकी रंगाची हाफ पँट, त्यावर पांढऱ्या रंगाचा सदरा, डोक्यावर काळी टोपी, कमरेला पट्टा, पायात बूट आणि हातात दंडुका.. अशा वेशातील रा. स्व. संघाचा स्वयंसेवक आता यापुढे संघ शाखेवर खाकी हाफ पँटऐवजी तपकिरी रंगाच्या पूर्ण पँटमध्ये दिसणार आहे. येथे सुरू असलेल्या संघाच्या प्रतिनिधी सभेत हा गणवेश बदलाचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. बाकी गणवेशात मात्र बदल करण्यात आलेला नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत संघ गणवेश बदलाची माहिती दिली. खाकी रंगाची सैलसर हाफ पँट व सदरा हा संघाचा स्थापनेपासूनचा गणवेश आहे. त्यात आता अंशत बदल करण्यात आला असून हाफ पँटऐवजी तपकिरी रंगाची पूर्ण पँट असा आता बदल असेल, असे जोशी यांनी सांगितले. येत्या चार-सहा महिन्यांत संघाच्या शाखेवर या बदललेल्या गणवेशाचे चित्र दिसून येईल, असेही जोशी म्हणाले. बदललेल्या गणवेशाचा संघाच्या प्रतिमेवर काहीही परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संघाने १९४० मध्ये गणवेशात अंशत बदल केला होता. यापूर्वी खाकी रंगाचा सदरा आणि खाकी रंगाची हाफ पँट असा गणवेश होता. मात्र, १९४० मध्ये त्यात बदल करून पांढऱ्या रंगाचा सदरा व खाकी हाफ पँट असा गणवेश करण्यात आला. तर १९७३ मध्ये चामडय़ाच्या बुटांची जागा रेक्झिन बुटांनी घेतली.

हल्लीच्या काळात पूर्ण पँट हा नियमित पेहेरावाचा भाग आहे. त्यामुळे गणवेशात करण्यात आलेला बदल हा काळानुरूपच आहे. तपकिरी रंगाचीच पँट का, याला काही विशिष्ट कारण नसून या रंगाची पँट सहज उपलब्ध असते आणि दिसायलाही आकर्षक असते.
– भय्याजी जोशी, सरकार्यवाह