रशियाचा ब्रिटनला निर्वाणीचा इशारा; १७१ जणांनी अमेरिका सोडली

ब्रिटनने राजनैतिक कर्मचारी पन्नास पेक्षा कमी करावेत अशा इशारा  रशियाने दिला असून पाश्चिमात्य देशांबरोबर रशियाचा वाद विकोपाला गेला आहे. रशियाने आधीच ब्रिटनच्या २३ राजनीतीज्ञांची या महिन्यात हकालपट्टी केली असून आता कारवाईचा आणखी बडगा उगारला आहे.

ब्रिटनमध्ये रशियन गुप्तहेरावर नव्‍‌र्ह एजंटचा हल्ला करण्यात आला होता त्यात त्याची कन्याही जखमी असून ते दोघेही आता आजारपणातून उठण्याची शक्यता नाही. सिर्गेई स्क्रिपाल व त्यांची कन्या युलिया यांच्यावर ब्रिटनमधील सॅलिसबरी शहरात विषप्रयोग करण्यात आला व तो रशियाने केला असा ब्रिटनचा आरोप होता. रशियाचा हा गुप्तहेर एकेकाळी ब्रिटिश गुप्तहेर संस्थेसाठीही काम करीत होता. रशियाच्या परराष्ट्र प्रवक्तया मारिया झाखारोवा यांनी सांगितले की, रशिया आता जशास तसे उत्तर देत आहे त्यामुळे अजूनही पन्नास राजनीतीज्ञ आमच्या देशात आहेत ते ब्रिटनने कमी करावेत.

शुक्रवारी रशियाने ब्रिटिश राजदूत लॉरी ब्रिस्टो यांना बोलावून रशियातील राजनैतिक कर्मचारी महिनाभरात कमी करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्याबरोबर इतर २३ देशांच्या दूतांनाही बोलावण्यात आले होते व त्यांना त्यांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना तेथून काढून  घेण्यास फर्मावण्यात आले. ब्रिटनचे राजदूत ब्रिस्टो यांना एक निषेध खलिता देण्यात आला त्यात रशियाच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून ब्रिटनने प्रक्षोभक कृती केल्याचा आरोप केला आहे. रशियाने केलेल्या घोषणेच्या परिणामांचा आम्ही विचार करीत आहोत असे लंडन येथे परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्याने सांगितले. रशियाच या सगळ्या घटनेला जबाबदार आहे असे ब्रिटनचे म्हणणे अजून कायम आहे. ब्रिटनच्या भूमीत दोन व्यक्तींचा खून करण्याचा प्रयत्न रशियाने केला हे सत्य लपून राहिलेले नाही असे सांगण्यात आले. अमेरिका, युरोपीय समुदाय व नाटो देशांनी एकूण १५० रशियन राजनैतिक अधिकाऱ्यांची  हकालपट्टी केली आहे. शुक्रवारी रशियाने २३ देशांच्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली त्यात फ्रान्स, जर्मनी, कॅनडा व पोलंड यांच्या प्रत्येकी चार राजनैतिक अधिकाऱ्यांना  हाकलण्यात आले आहे. ऑस्ट्रेलिया, युक्रेन, नेदरलँडस, स्वीडन, झेक प्रजासत्ताक, फिनलंड, लिथुआनिया, नॉर्वे या देशांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची रशियाने हकालपट्टी केली आहे.

अमेरिकेने रशियाच्या साठ राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली असून त्यांनी शनिवारी प्रस्थान ठेवले. रशियाचे राजदूत अ‍ॅनातोली अँटोनोव यांनी सांगितले की, एकूण १७१ जण अमेरिका सोडून जात आहेत. ब्रिटनच्या राजघराण्याचा कुठलाही प्रतिनिधी २०१८ मध्ये रशियातील जागतिक फुटबॉल स्पर्धेत हजेरी लावणार नाही असे स्पष्ट करण्यात आले.

युलिया स्क्रिपाल हिला दूतावास संपर्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन ब्रिटनने शनिवारी दिले आहे. गुरुवारी ती अतिदक्षता विभागातून बाहेर आली असून तिची प्रकृती सुधारत आहे. सिर्गेई स्क्रिपाल यांची स्थिती गंभीर पण स्थिर आहे. स्क्रिपाल यांनी गुप्त माहिती ब्रिटनला विकली होती. गुप्तहेरांच्या अदलाबदलीत ते २०१० मध्ये ब्रिटनमध्ये आले नंतर त्यांची कन्या युलियाही रशियातून येथे आली होती.