रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील वर्षी मे महिन्यात दुसऱ्या महायुद्धाच्या विजयाचा अमृतमहोत्सव दिन साजरा करण्यासाठी रशिया भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले आहे. मोदी यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांची येथे बैठक पार पडली त्यावेळी उभयतांनी द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचा आढावा घेतला व विशेष धोरणात्मक सहभागाबाबत चर्चा केली.

दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा उभारण्याबाबत सहकार्य करणे आणि जगातील पाच मोठय़ा अर्थव्यवस्थांसमवेत असलेले संबंध अधिक बळकट करणे यावर ब्रिक्स परिषदेत प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. मोदी ११ व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने येथे आले असून त्यांनी बुधवारी पुतिन यांच्याशी चर्चा केली आणि भारत-रशिया संबंधांचा व्यापक आढावा घेतला.

पुतिन यांच्यासमवेत चांगली चर्चा झाली, आम्ही दोन्ही देशांमधील संबंधांचा आढावा घेतला. व्यापार, सुरक्षा आणि संस्कृती आदी क्षेत्रांमध्ये दोन्ही देश एकमेकांना उत्तम सहकार्य करीत आहेत, दोन्ही देशांमध्ये असलेल्या उत्तम संबंधांचा दोन्ही देशांना लाभ होईल, असे मोदी यांनी ट्वीट केले आहे. मोदी आणि पुतिन यांची या वर्षी चौथ्यांदा भेट झाली. सततच्या भेटींमुळे आमच्यातील संबंध दृढ झाले आहेत, असे मोदी यांनी म्हटले आहे.