आपल्या विस्तावादी भूमिकेमुळे कायमच चर्चेत असणाऱ्या चीनची जमीनीसाठी आणि व्यापार वाढवण्यासाठी सुरु असलेली धडपड मागील काही काळापासून शेजारी देशांना त्रासदायक ठरु लागली आहे. जगासमोर करोनाचे संकट असतानाच पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये भारत आणि चीनदरम्यान संघर्ष झाला. त्यानंतर नेपाळ आणि भूतानमधील जमीनीवरही चीनचा डोळा असल्याचे मागील काही आठवड्यांमधील हलचालींमधून दिसून आलं आहे. भारताला त्रास देण्यासाठीच या दोन लहान देशांमधील भूप्रदेशावर चीनचा डोळा असल्याचे समजते. असं असतानाच आता चीनमधील सीजीटीएन वृत्तवाहिनीच्या संपदाकांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. रशियामधील ब्लादिवोस्तोक शहरावरही चीनचा हक्क असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. ब्लादिवोस्तोक शहर दीडशे वर्षांपूर्वी चीनचा भाग होतं असं या संपादाने म्हटलं आहे. त्यामुळे आता रशियामध्येही चीनविरोधात चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.

नुकताच व्लादिवोस्तोक शहराचा स्थापना दिवस रशियामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रशियामधील चिनी दूतावासानेही यासंदर्भातील काही फोटो शेअर केले. हे फोटो पाहून चीनमधील काही लोकांनी हे शहर तर आपल्याच देशाचा भाग होता अशा प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. याच दरम्यान सीजीटीएनचे संपादक शेन सिवई यांनी रशियामधील व्लादिवोस्तोक हे शहर १८६० मध्ये चीनचा भाग होतं. व्लादिवोस्तोक हे आधी हैशेनवाई या नावाने ओळखलं जायचं. मात्र रशियाने चीनच्या ताब्यात हे शहर बळकावले आणि त्याचे नाव बदलले, असं या संपादकाचं आणि चिनी लोकांचं म्हणणं आहे.

नंतर दिलं स्पष्टीकरण…

या प्रकरणाची सोशल मिडियावर जोरदार चर्चा सुरु झाल्यानंतर या संपादकाने स्पष्टीकरण देताना सीमेसंदर्भातील करारावर दोन्ही देशांनी मान्यता दिल्याने चीनचा या शहरावर दावा नाहीय असं म्हटलं. मात्र अजूनही हा वाद सुरुच आहे. चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमे ही सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचाच चेहरा असल्याचे मानले जाते. जर एवढ्या मोठ्या सरकारी वृत्तवाहिनीचा संपादक उघडपणे ही गोष्ट मांडत असेल तर कुठेतरी सरकारच्या मनातही हेच विचार आहेत का अशी चर्चा आता चीन आणि रशियामधील नेटकऱ्यांमध्ये रंगू लागली आहे.

या शहराला लष्करी महत्व…

सन १८६० मध्ये रशियन लष्कराने या शहराची स्थापना केली आणि त्याला व्लादिवोस्तोक असं नाव दिलं. या शब्दालाचा अर्थ पूर्वेचा राजा असा होतो. हे शहर रशियामधील प्रोमोर्स्की क्राय या राज्याच्या राजधानीचे शहर आहे. आधी हे शहर खरोखरच चीनच्या ताब्यात होतं. १८६० मध्ये चीन आणि रशियामध्ये इगनचा तह आणि पिकिंगचा तह असे दोन महत्वपूर्ण करार झाले. या करारांनुसार व्लादिवोस्तोकचा ताबा रशियाला देण्यात आला. त्यानंतर या शहराचा झपाट्याने विकास होण्यास सुरुवात झाली. सध्या हे शहर पॅसिफिक महासागरातील रशियन नौदलाच्या प्रमुख तळांपैकी एक तळ म्हणून ओळखलं जातं. व्यापाराच्या दृष्टीनेही हे शहर रशियासाठी महत्वाचे आहे. रशियामधून होणाऱ्या बऱ्याचश्या व्यापारी जहाजांची वाहतूक या बंदरामधून होते.

अर्थकारणाचे केंद्र…

त्याचबरोबरच या शहराला ऐतिहासिक महत्वही आहे. पहिल्या महायुद्दाच्या काळामध्ये व्लादिवोस्तोक हे शहर अमेरिकेकडू पाठवण्यात येणारा माल उतरवण्यासाठीचे प्रमुख बंदर होते. युद्धाच्या कालावधीमध्ये या बंदरावर खूप मोठ्या प्रमाणात जपानी सैन्य गोळा झालं होतं. या सैन्याला १९२२ पर्यंत येथून बाहेर काढता आलं नव्हतं. जपानी सैन्य येथून गेल्यानंतर रशियाने या शहरावर आपला ताबा मिळवला. सध्या या शहरातील बहुतांश लोकांच्या कमाईचे साधन हे समुद्र मार्गे होणारा व्यापार हेच आहे. येथील लोकांच्या एकूण कमाईपैकी तीन चतृर्थांश हिस्सा हा मासेमारीच्या माध्यमातून होतो. या बंदरामधूनच जपानमधून निर्यात होणाऱ्या चार चाकी गाड्या जगभरामध्ये पाठवल्या जातात. आर्थिक दृष्ट्या रशियासाठी हे शहर अत्यंत महत्वाचे आहे.

चीनची मोठी गुंतवणूक

रशियामधील या शहराचा विकास करण्यासाठी चीननेही मोठी आर्थिक मदत केली आहे. याच गुंतवणूकीमुळे आता दोन्ही देशांमध्ये या शहरावरुन पुन्हा वाद सुरु झाल्याचे चिन्हे दिसत आहे. या शहराचा विकास करण्याच्या नावाखाली शहरात मोठ्या प्रमाणावर चिनी कामगार आणि इंजिनियर्स दाखल झाले आहेत. शहरात सध्या लाखो चिनी लोकांचे वास्तव्य आहे. येथे चिनी लोकांचे वेगळे बाजारही आहेत. चिनी संस्कृतीची झलक आता या शहरामध्ये दिसू लागली आहे. चीन लष्करी बळाचा वापर करुन हे शहर पुन्हा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करु शकतं अशी भीती आता रशियामधील राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.