पुत्र अखिलेश याच्याविरोधात संघर्षांचा पवित्रा घेणारे समाजवादी पक्षाचे सर्वोच्च नेते मुलायमसिंह यादव यांनी सोमवारी आपला पवित्रा बदलत, ‘पक्षाची सत्ता निवडणुकीनंतर कायम राहिली तर अखिलेश हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहतील’, असे जाहीर केले. सपच्या सायकल या निवडणूक चिन्हावरून अखिलेश व मुलायम यांच्या गटांत तीव्र संघर्ष सुरू असताना मुलायम यांनी हे विधान केले. सपमध्ये कुठलेही वाद नाहीत, असा दावाही मुलायम यांनी केला.

सपमधील निवडणूक चिन्हाचा वाद चिघळला

  • अखिलेशशी मतभेद नाहीत, पण मीच अध्यक्ष-मुलायम

समाजवादी पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबतच्या वादावर लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी अखिलेश यादव गटाने केली असतानाच; आपले मुलाशी काहीही मतभेद नाहीत, मात्र आपण अजूनही पक्षाचे प्रमुख आहोत असे मुलायमसिंह यादव यांनी सांगितल्याने पक्षातील गटबाजीचे युद्ध सोमवारी आणखी चिघळले.

भरीस भर म्हणून, आपले चुलतभाऊ रामगोपल यादव यांना ३० डिसेंबरला पक्षातून काढण्यात आले असल्यामुळे त्यांची राज्यसभेतील पक्षनेते म्हणून मान्यता रद्द करावी, अशी मागणी मुलायम यांनी सभापती हमीद अन्सारी यांच्याकडे केली. पक्षातून हकालपट्टी केल्यामुळे रामगोपाल यांची बसण्याची व्यवस्था मागच्या रांगेत करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

इकडे, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी नामांकनाची प्रक्रिया १७ जानेवारीपासून सुरू होत असल्यामुळे पक्षाच्या ‘सायकल’ या निवडणूक चिन्हाबाबत लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहन रामगोपाल यांनी निवडणूक आयोगाला केली. पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल व नीरज शेखर हे त्यांच्यासोबत होते. मुख्यमंत्री अखिलेश यादव हेच या मोहिमेचे नेतृत्व करणार होते, परंतु ऐनवेळी त्यांनी दिल्ली भेट रद्द केली. यापूर्वी मुलायम सिंह व त्यांचे विश्वासू अमर सिंह व शिवपाल सिंह हे निवडणूक अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी निर्वाचन सदनात पोहचले. या वेळी त्यांनी कुठलीही नवी कागदपत्रे सादर केली नाहीत, मात्र मुलायम हे अद्यापही पक्षाचे प्रमुख असून पक्ष व त्याच्या चिन्हावर त्यांचाच कायदेशीर हक्क असल्याचा दावा त्यांनी केला.

अखिलेश यादव यांच्याबाबत निष्ठा व्यक्त करणारी पक्षेनत्यांची शपथपत्रे बनावट असून त्यांची पडताळणी करावी, अशी मागणी मुलायम यांनी आयोगाला केली. अखिलेश यांना पक्षाध्यक्ष नेमण्याचा ठराव विशेष अधिवेशनात करण्यात आला असला तरी आपल्याला या पदावरून हटवण्याचा ठराव झालेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.