पिकांना हमीभाव मिळावा यासाठी पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आंदोलन करत आहेत. दोन्ही राज्यांमधील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. परंतु, केंद्र सरकारने या शेतकऱ्यांना दिल्लीपासून दूर रोखलं आहे. पोलिसांनी रस्ते बंद केले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांनी या शेतकऱ्यांवर लाठीहल्ले केले आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी त्यांच्यावर अश्रूधुराचा मारा केला. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या या शेतकऱ्यांची देशभरात चर्चा पाहायला मिळत आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या शिष्टमंडळाने आतापर्यंत तीन वेळा शेतकऱ्यांच्या प्रतिनिधिंशी चर्चा केली. परंतु, या तिन्ही चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. अशातच शेतकऱ्यांनी आता सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे शेतकरी २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शंभू सीमा आणि खनौरी सीमेवरून शांततापूर्ण वातावरणात दिल्लीच्या दिशेनं मोर्चाला सुरुवात करतील.

दरम्यान, शिवसेनेचा ठाकरे गट या आंदोलनाला पाठिंबा देणार असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः दिल्लीला जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. यावर ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले, या शेतकरी आंदोलनासंदर्भात माहिती घेण्यासाठीच मी इथे (दिल्ली) आलो होतो. शेतकरी दिल्लीपासून किती लांब आहेत? याची मी माहिती घेतली. सध्या या शेतकऱ्यांना सरकारने दिल्लीपासून २५० ते ३०० किमी दूर रोखलं आहे.

संजय राऊत म्हणाले, आमच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या संवेदना सर्वांना माहिती आहेत. आमच्या पक्षात या आंदोलनावर चर्चा झाली आहे. शेतकऱ्यांचं इतकं मोठं आंदोलन चालू आहे. एमएसपी म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राईस ही त्यांची प्रमुख मागणी आहे. हा विषय केवळ पंजाब हरियाणाशी संबंधित नसून हे शेतकरी देशातील शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी दिल्लीकडे कूच करत आहेत. अशावेळी त्यात महाराष्ट्रातून शिवसेनेचं काय योगदान असायला हवं याबाबत उद्धव ठाकरे संवेदनशील आहेत.

हे ही वाचा >> “आमच्यावर विषप्रयोग करून…”, पुतिन यांचा दाखला देत संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला; म्हणाले, “प्रखर बोलणाऱ्यांविरुद्ध…”

संजय राऊत म्हणाले, मागच्या वेळी राकेश टिकैत यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं आंदोलन झालं तेव्हा मी स्वतः आणि अनेक शिवसैनिक त्या आंदोलनात सहभागी झालो होतो. यावेळी शेतकऱ्यांना अद्याप दिल्लीत येण्यापासून रोखलं आहे. त्यांच्यावर बंदूका रोखल्या आहेत. भिती उभ्या केल्या आहेत, रस्त्यांवर खिळे ठोकले आहेत. याबाबतची सर्व माहिती घेण्यासाठी मी इथे आलो आहे. आता मी मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करेन.