मी ‘दिल्लीकडे पाहिले असते’, तर जम्मू-काश्मीर विधानसभा विसर्जित करण्याऐवजी मला सज्जाद लोन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला संधी द्यावी लागली असती, असे वक्तव्य करून काही दिवसांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आता ‘बदलीची भीती कायम असते’, असे म्हटले आहे.

काँग्रेसचे नेते व माजी मंत्री गिरधारीलाल डोग्रा यांच्या ३१व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मलिक यांनी बदलीच्या भीतीचा उल्लेख केला.

गिरधारीलाल यांनी त्यांचे आयुष्य गरिबांसाठी वेचले. जोवर मी इथे आहे, तोवर नक्कीच त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येईल. कधी बदली होईल, हे सांगता येत नाही. माझी नोकरी तर जाणार नाही, पण बदलीची भीती कायम असते, असे मलिक म्हणाले.

शनिवारी ग्वाल्हेरच्या आयटीएम विद्यापीठात मलिक यांचे भाषण झाले होते. ‘मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, की मी दिल्लीकडे पाहिले असते, तर मला लोन यांचे सरकार बनवावे लागले असते, आणि मग इतिहासात माझी नोंद एक अप्रामाणिक व्यक्ती म्हणून झाली असती. त्यामळे मी हे प्रकरण संपवून टाकले. जे शिव्या देतील, ते देवोत, पण मी योग्य तेच काम केले याची मला खात्री आहे,’ असे ते या वेळी म्हणाले होते.