येमेन हा अरब द्वीपकल्पातला तळाकडचा लहानसा देश, त्याची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही, तरी तो आता संघर्षांच्या खाईत लोटला गेला आहे. अलीकडेच सौदी अरेबिया व मित्र पक्षांनी या देशातील बंडखोरांवर हल्ला करून त्यांचे कंबरडे मोडण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी त्याची बीजे सप्टेंबरमध्ये हाउथी बंडखोरांनी येमेनची राजधानी सनावर मिळवलेल्या विजयात आहेत, तेथील अध्यक्ष अब्द राबू मनसौर हादी हे अमेरिकेचे बाहुले होते व त्यांना नंतर देश सोडून जावे लागले. नंतर ते अॅडेनला गेले तेथून ते रियाधला आल्याचे समजते. अरब द्वीपकल्पात हादी हे अल काईदा विरोधात लढण्यासाठी अमेरिकेचे उजवे हात होते.
हवाई हल्ल्यात ३९ नागरिक ठार
हादी हे आखाती देश व पाश्चिमात्यांचे हस्तक आहेत असा संशय असलेल्या हाउथी बंडखोरांना २०१२ मध्ये हकालपट्टी झालेले अली अब्दुल्ला सलेह यांचा पाठिंबा आहे. सलेह यांनी ३० वर्षे तेथे सत्ता राबवली होती.  त्यांचे पुत्र बंडखोरांच्या बाजूने आहेत.आता मध्यपूर्वेकडील या देशांमध्ये सत्तासमीकरणे हाती घेण्यासाठी हातघाई सुरू झाली आहे.

कोण कुणाच्या बाजूने?
येमेनचा प्रश्न चिघळत असताना अमेरिकेने सौदी अरेबियाला येमेनमधील बंडखोरांच्या विरोधात मदत करणे साहजिक आहे. सौदी अरेबिया हा अमेरिकेचा लाडका मित्र तर इराण शत्रू, त्यामुळे आता येमेनमध्ये कारवाईने इराणला सूडाचे धुमारे फुटत आहेत. अमेरिकेला येमेनमध्ये हस्तक्षेप करण्याचे कारण म्हणजे हातचे एक बाहुले गेले तर सत्तासमतोलात कमी पडण्याची भीती त्यांना वाटते. सौदी अरेबिया कारवाई करत असला तरी त्यांची तेवढी क्षमता नाही. पडद्यामागे अमेरिकाच सूत्रे हलवित आहे. दहशतवाद विरोधी कारवाईसाठी येमेन हा अमेरिकेचा तळ आहे. एकेकाळी तेथेच दहशतवाद्यांना प्रशिक्षण मिळत होते. यात इजिप्त सौदी अरेबियाच्या बाजूने आहे. इराणचा येमेनमधील बंडखोरांना पाठिंबा आहे.
सौदी अरेबिया विरूद्ध इराण
संघर्ष येमेनमध्ये असला तरी तेथे सौदी अरेबिया व इराण यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सौदी अरेबियात सुन्नी पंथाची सत्ता आहे तर इराणमध्ये शियांचे सरकार आहे व त्यात येमेन हा देश प्यादे बनला आहे.इराणला धाकात ठेवले नाही तर आपली सुरक्षा धोक्यात येईल असे सौदी अरेबियाला वाटते. शिया बंडखोरांचे मुजोरी हल्ले मोडून काढण्याची सौदी अरेबियाची उघडपणे पहिलीच वेळ आहे. सौदी अरेबियाने दीड लाख सैन्य येमेनच्या सीमेवर आणले आहे.