सौदी अरबमधील प्रमुख तेल उत्पादक कंपनी असलेल्या सौदी अरामकोने भारताला इंधनाची कमी भासू देणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. असे तेल मंत्रालयाने सोमवारी सांगितले आहे. विशेष म्हणजे सौदी अरामकोच्या अबकेक आणि खुराइस येथील  केंद्रांवर दोन दिवसांपूर्वीच ड्रोनद्वारे हल्ले झालेले आहेत. पीटीआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

सौदी अरामकोच्या अधिकाऱ्यांनी रविवारी भारतीय रिफायनरींना इंधन पुरवठ्यात कमी भासू दिली जाणार नसल्याचे सांगितले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय भारतीय रिफायनर आणि सौदी अरामको यांच्याशी सल्लामसलत करून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे, असे तेल मंत्रालयाकडू सांगण्यात आले आहे.

जगातल्या सर्वा मोठ्या तेल कंपन्यांपैकी एक अशी ओळख असलेली सौदी अरेबियातील अरामको कंपनीच्या दोन केंद्रांवर ड्रोनद्वारे शनिवारी सकाळी हल्ले झाले होते.  त्यामुळे आगामी चार महिन्यात इंधनाचे दर सर्वोच्च पातळीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयाने आपण या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगत, भारतीय रिफायनर आणि सौदी अरामकोशी चर्चा करत असल्याचे म्हटले आहे.

सुरूवातीस या हल्ल्यामुळे नेमके किती नुकसान झाले आहे हे जरी अस्पष्ट असले, तरी यामुळे देशातील निम्म्याहून अधिक इंधन उत्पादन उत्पादन घटले आहे आणि दररोजचा ५.७ दशलक्ष बॅरल किंवा जगातील पाच टक्के पुरवठा कमी झाला आहे.  इंधन पुरवठ्यात इराकनंतर दुसरा क्रमांक सौदीचा लागतो, तर भारत आपल्या गरजेच्या ८३ टक्के तेलाची आयात करतो. सौदीने २०१८-१९ या आर्थिक वर्षात निर्यात केलेल्या एकूण २०७.३ दशलक्ष टन तेलापैकी भारताने ४०.३० दशलक्ष टन कच्चा तेलाची खरेदी केली आहे.