पाकिस्तानच्या इशाऱ्यावरुन घडवण्यात आलेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यावरुन संपूर्ण देशात प्रचंड संतापाचे वातावरण आहे. प्रत्येक नागरिक आपआपल्यापरीने या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवत आहे. व्हॉट्सअॅपवर डिपी, स्टेटस ठेवून फेसबुकवर पोस्ट लिहून, रेल रोकोच्या मार्गाने प्रत्येकाने आपआपल्या मार्गाने पुलवामा हल्ल्याचा निषेध नोंदवला आहे.

रस्त्यावर खाद्यपदार्थांचा स्टॉल लावणाऱ्या अंजल सिंह या फेरीवाल्याने पाकिस्तानच्या निषेधासाठी अनोखा मार्ग अवलंबला आहे. अंजल सिंहच्या स्टॉलवर रुचकर मांसाहारी पदार्थ मिळतात. या स्टॉलवर येणाऱ्यांसाठी त्यांनी खास ऑफर ठेवली आहे. “पाकिस्तान मुर्दाबादचा” नारा देणाऱ्यांना चिकन लेग पीसवर १० रुपयांचा डिस्काऊंट मिळतो.

अंजल सिंह यांच्या स्टॉलवर मिळणाऱ्या कबाब, तंदूर आणि लेग पीसचा अस्वाद घेण्यासाठी तुम्हाला मात्र छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील जगदालपूर शहरात यावे लागेल. येथे निळया रंगाच्या छोटयाशा हातगाडीवर ते स्टॉल लावतात. अशा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवण्याबद्दल अंजल सिंह म्हणतात की, पाकिस्तानला माणुसकीची किंमत नाही आणि त्यांना ती कधी कळणारही नाही. पुलवामाच्या या हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले.