विद्यार्थ्यांनी केलेली हत्या लपवण्यासाठी चक्क शाळा प्रशासनानेच 12 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. देहरादूनमध्ये ही घटना घडली आहे. वासू यादव असं या विद्यार्थ्याचं नाव असून बोर्डिग स्कूलमध्ये शिकत होता. त्याच्या सीनिअर्सनी क्रिकेट बॅटने मारहाण करत त्याची हत्या केली होती. डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर शाळा प्रशासनाने बदनामी होऊ नये या भीतीने मृतदेह पुरुन टाकला. मुलाच्या कुटुंबीयांना मृत्यू झाल्याची माहिती देण्याची तसदीही शाळेने घेतली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या आवारातच मुलाचा मृतदेह पुरण्यात आला होता. बुधवारी ही घटना उघडकीस आली. इतकंच नाही तर मुलाला मारहाण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल कऱण्यात उशीर झाल्याचंही समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीनिअर विद्यार्थ्यांना त्याने बिस्किटचा पुडा चोरल्याचा संशय होता. यामुळे त्यांनी वर्गात नेऊन त्याला बॅटने मारहाण केली. वॉर्डनच्या लक्षात येईपर्यंत पुढील काही तास हा प्रकार सुरु होता. ‘मुलाला संध्याकाळी काही वेळाच्या अंतराने सतत मारहाण करण्यात आली. त्याला उशीरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं’, अशी माहिती एसएसपी निवेदिता कुकरेती यांनी दिली आहे.

उत्तराखंड राज्य बाल अधिकार संरक्षण राज्य आयोगाच्या अध्यक्षा उषा नेगी यांनी सांगितल्यानुसार, हत्या लपवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न कऱण्यात आले. ’10 मार्च रोजी घटना घडली आणि आम्हाला 11 मार्च रोजी कळवण्यात आलं. घटनेची माहिती मिळाली असता आम्ही तिथे पोहोचलो. तिथे पोहोचलो असता मुलाचा मृतदेह पुरला असल्याचं लक्षात आलं’, असं त्यांनी सांगितलं.