आम आदमी पक्षाचे (आप) संस्थापक सदस्य शांतीभूषण यांनी गुरूवारी ‘आप’मध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे सांगत पक्षाला घरचा आहेर दिला. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर किरण बेदींना स्वत:च्या गोटात सामील करत त्यांना मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी देऊन भाजपने चलाख राजकीय खेळी केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, हे शांतीभूषण यांचे वैयक्तिक मत असून, प्रत्येकाला अशाप्रकारचे विचारस्वातंत्र्य असणे हे आपमधील अंतर्गत लोकशाहीचे प्रमाण असल्याचा दावा ‘आप’तर्फे करण्यात आला. परंतु, शांतीभूषण यांच्या वक्तव्याने पक्षातील अंतर्गत धुसफुस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार निर्मुलन मोहिमेत किरण बेदी यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. त्यामुळे त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्यास अण्णा हजारेंना आनंदच होईल, असे शांतीभूषण यांनी म्हटले. शांतीभूषण यांच्या वक्तव्यावर किरण बेदींनी मात्र, शांत राहणेच पसंत केले.
ज्या उद्दिष्टांसाठी ‘आप’ची स्थापना करण्यात आली होती, त्यापासून पक्ष सध्या भरटकताना दिसत आहे. त्यामुळे पक्षाच्या वाटचालीची दिशा बदलणे गरजेचे आहे. पक्षाने नेहमीच परिवर्तनवादी आणि राजकारणाचा दर्जा वृद्धिंगत करणाऱ्या व्यवस्थेवर भर दिला पाहिजे, असे मत शांतीभूषण यांनी व्यक्त केले.
शांतीभूषण यांच्या वक्तव्यानंतर ‘आप’मधून सध्यातरी सावध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी याबद्दल बोलताना, शांतीभूषण यांचे वक्तव्य पक्षातील अंतर्गत लोकशाही अधोरेखित करणारे असल्याचे सांगितले. ‘आप’मध्ये निर्णय घेण्यासाठी लोकपाल असून, या व्यवस्थे अतंर्गतच विधानसभेसाठी नुकताच दोन उमेदवारांना बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे केजरीवालांनी म्हटले. तर आपचे दिल्लीतील समन्वयक आशुतोष यांनीही पक्ष शांतीभूषण यांच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले.