भारतासोबत चर्चेसाठी नवाझ शरीफ यांचीच पूर्वअट

भारताशी चर्चा करण्याची पाकिस्तानची तयारी आहे, मात्र त्यासाठी कोणतीही पूर्वअट घालण्यात येऊ नये, असे स्पष्ट संकेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिले असल्याचे पाकिस्तानातील दूरचित्रवाणी वाहिनी ‘जिओ’ने म्हटले आहे
ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याशी शरीफ यांनी राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या बैठकीत (चोगम) शुक्रवारी चर्चा केली त्यावेळी शरीफ यांनी वरील संकेत दिल्याचे वाहिनीने म्हटले आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यासह अन्य शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची पाकिस्तानची इच्छा आहे, असे शरीफ म्हणाल्याचेही वाहिनीने म्हटले आहे. सीमेवरील गोळीबार आणि शस्त्रसंधीचे सातत्याने होणारे उल्लंघन यावरून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.
गेल्या ऑगस्ट महिन्यात दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये होणारी चर्चा कार्यक्रमनिश्चितीवरून रद्द झाली होती.
भारताला दहशतवादी हल्ल्यांबाबतचा मुद्दा उपस्थित करावयाचा होता तर पाकिस्तानला काश्मीर प्रश्न उपस्थित करावयाचा होता.
पॅरिस आणि ब्रिटनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पाकिस्तानला अतीव क्लेश झाल्याचे शरीफ यांनी कॅमेरून यांना या वेळी सांगितले. पाकिस्तानलाही दहशतवादी हल्ल्यांची झळ सोसावी लागली असल्याने फ्रान्समधील जनतेचे दु:ख आपल्याला कळू शकते, असे शरीफ म्हणाले.
पाकिस्तान आणि ब्रिटन यांच्या सुरक्षा आणि भरभराटीसाठी सातत्याने एकत्रित काम करण्याचे दोन्ही नेत्यांनी मान्य केले. दहशतवादाचा धोका, संघटित गुन्हेगारी आणि बेकायदेशीर स्थलांतर याविरोधात दोन्ही देशांनी सहकार्य करण्यास बांधील असल्याचे स्पष्ट केले.