पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी झाली असून इस्लामाबादेत भारतीय उच्चायुक्तांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत या झिंगलेल्या माकडांनी घातलेला गोंधळ असह्य असल्याचे टीका शिवसेनेने केली आहे. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर मोदी सरकारने मुजोर पाकड्यांची नांगी ठेचलीच आहे, पण शेपूट अजूनही वळवळत असून सरकारने हा तमाशा विसरू नये, असे देखील शिवसेनेने म्हटले आहे.

पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे शनिवारी भारतीय उच्चायुक्तांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. या इफ्तार पार्टीसाठी आलेल्या पाहुण्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी प्रवेशद्वाराजवळच रोखले होते. या प्रकारावरुन मंगळवारी सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने पाकवर टीका केली. भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला बालाकोट येथे हवाई हल्ला करुन घेतला. तेव्हापासून पाकिस्तान तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असून यानंतर भारताच्या राजनैतिक यंत्रणेने जोर लावून मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. हे फुटके थोबाड घेऊन पाकिस्तानला जगासमोर येणे कठीण असतानाच मोदी सरकार पुन्हा भरघोस बहुमताने सत्तेवर आले. या धक्क्यातून पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान सावरणे कठीण आहे, अशा शब्दात शिवसेनेने पाकचा समाचार घेतला.

शनिवारी इस्लामाबादमधील इफ्तार पार्टीप्रसंगी जे घडवले गेले ते शांतता प्रक्रियेसाठी टाकलेले पाऊल मानावे का?, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेने पुढे म्हटले आहे की, पाकिस्तानचे ढोंग पुन्हा उघडे पडले. पाकिस्तान चर्चा करण्याच्या लायकीचा देश नाही. इस्लामाबादमधील इफ्तार पार्टीत ‘जानेमाने’ लोक होते. ज्येष्ठ पत्रकार, लेखक, विचारवंत, कलावंत व प्रशासकीय अधिकारी यांचा त्यात समावेश होता. या सर्व निमंत्रितांना हॉटेलात शिरण्यापासून रोखले गेले. इतकेच नाही, तर अत्यंत अपमानास्पद पद्धतीने त्यांची झडती घेण्यात आली. दहशतवादविरोधी पथकाने कार्यक्रमस्थळी घेराव घातला. या इफ्तार पार्टीस मसूद अजहरछाप लोकांना बोलावले नाही याचा संताप बहुधा पाकला आला असावा.

दिल्लीतील पाक उच्चायुक्तांच्या इफ्तार पार्टीवर भारत सरकारने नियंत्रण आणले. कारण त्या पार्टीत काश्मीरातील फुटीरतावाद्यांसाठी पायघड्या घातल्या होत्या. भारताच्या सार्वभौम स्वातंत्र्यास आव्हान देणाऱ्यांना पाक उच्चायुक्त दिल्लीत बोलावून शिरकुर्मा खिलवणार असतील तर त्यांना रोखावे लागेल, असे मतही शिवसेनेने व्यक्त केले.