आपला देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. मात्र, इथल्या तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. इथं आता एखाद्या छोट्याशा पदावरील काम मिळवण्यासाठी मोठ्या डिग्र्यांवाले लाखो तरुण धडपड करताना पहायला मिळत आहेत. रेल्वे भरती दरम्यान याची कायमच प्रकर्षाने जाणीव होते. सध्या भारतीय रेल्वेमध्ये सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात येत आहे. यासाठी असणाऱ्या १० हजार रिक्त जागांसाठी तब्बल ९५ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. आता रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डासमोर इतक्या लोकांची परिक्षा कशी घ्यायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

रेल्वे सुरक्षा बलाचे महासंचालक अरुण कुमार सिंह यांनी सांगितले की, देशभरात रेल्वेमध्ये शिपाई पदासाठी ८,६१९ आणि उपनिरिक्षक पदासाठी ११२० जागा काढण्यात आल्या आहेत. या दोन्ही पदांसाठी आत्तापर्यंत ९५ लाख ५१ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाल्यानंतर परिक्षेचे नियोजन करणे मोठे आव्हानात्मक काम होणार आहे. यावर मात करण्यासाठी केंद्रीय संगणकीय सिस्टिम तयार करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक उमेदवाराला पदाप्रमाणे सिस्टिममध्ये वर्गीकृत केले जाणार आहे. याच आधारावर आता परिक्षा घेण्यात येईल.

यामध्ये कॉन्स्टेबल पदासाठी महिलांच्या ४२१६ तर पुरुषांच्या ४४०३ जागांसाठी एकूण ७६.६० लाख अर्ज आले आहेत. तर उपनिरिक्षक पदासाठी महिलांच्या ३०१ आणि पुरुषांच्या ८१९ जागांसाठी एकूण १८.९१ लाख अर्ज आले आहेत. या दोन्ही पदांसाठीचे एकूण अर्ज ९५ लाख ५१ हजार आहेत.

देशभरात आरपीएफच्या जवानांचाही डेटाबेस तयार केला जात आहे. पायलट प्रोजेक्टनुसार आजवर उत्तर आणि पूर्व रेल्वेच्या ९ हजार आरपीएसएफचा डेटाबेस तयार झाला आहे. त्याशिवाय सीसीटीव्ही मॉनिटरच्या आऊटसोर्सिंगचा निर्णय घेण्यात आल्याचे अरुण कुमार सिंह यांनी सांगितले.