जम्मू-काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात शनिवारी आणखी एका काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे. दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील चौधरी गुंड भागात पूरन कृष्ण भट यांच्यावर त्यांच्या घराजवळ हल्ला करण्यात आला. रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हत्येच्या काही तासांनंतर ‘काश्मीर फ्रीडम फायटर्स’ या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली. इतकंच नाही तर अशा प्रकारचे आणखी हल्ले करण्याचा इशाराही दिला आहे.

रविवारी जम्मूमध्ये पूरन कृष्ण भटयांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी घोषणाही देण्यात आल्या. त्यांच्या मागे ४१ वर्षीय पत्नी, मुलगी आणि मुलगा आहे. दोन्ही मुलं शाळेत शिकत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूरन कृष्ण शोपियाँ येथील त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता असणाऱ्या सफरचंदाच्या बागेत चालले होते.

आणखी एका काश्मिरी पंडिताची दहशतवाद्यांकडून हत्या

पूरन कृष्ण भटयांच्या बहिणीने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत ‘काश्मीर खोऱ्यात हिंदू सुरक्षित नाहीत. आमचे मुस्लीम शेजारीही तुमची सुरक्षा करु शकत नाही असं सांगत आहेत,’ असं म्हटलं आहे.

‘दहशतवादी सर्व काश्मिरी पंडितांची हत्या करतील’

दहशतवादी परिसरातील हिंदूंची हत्या करण्यासाठी संधी शोधत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्या म्हणाल्या आहेत की “काही आठवड्यांपूर्वी दहशतवादी शाळेत घुसले होते. ते हिंदू शिक्षकांना शोधत होते. सुदैवाने तिथे कोणीही हिंदू शिक्षक नव्हते. मी सर्व हिंदूंना खोरं सोडून जा असं आवाहन करते. दहशतवादी सर्व काश्मिरी पंडितांची हत्या करतील”.

यावेळी त्यांनी शुक्रवारी फोन आल्यापासून आपल्या भावाला असुरक्षित वाटत होतं अशी माहिती दिली. “मी शुक्रवारी संध्याकाळी माझ्या भावाशी बोलले. त्याला असुरक्षित वाटत होतं. आम्ही त्याला खोरं सोडून जा म्हणून सांगितलं. पण त्याने मुलांसाठी पैशांची व्यवस्था करायचं आहे असं सांगितलं,” असं त्यांनी सांगितलं.