प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु सद्गुरु जग्गी वासुदेव यांचा तमिळनाडूमधील कोइम्बतूर याठिकाणी इशा फाऊंडेशन नावाची संस्था आहे. या ठिकाणाहून २०१६ पासून सहा लोक बेपत्ता झाले आहेत. ते परत आले की नाही, याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे पोलिसांनी मद्रास उच्च न्यायालयात सांगितले. न्या. एम. एस. रमेश आणि न्या. सुंदर मोहन यांच्या खंडपीठासमोर हॅबियस कॉर्पस या याचिकेवर सुनावणी झाली असताना पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. थिरुमलाई यांचा भाऊ गणेशनला शोधून आणण्यासाठी ही याचिका त्यांच्यावतीने दाखल करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

थिरुमलाईने न्यायालयाला सांगितले की, त्याचा भाऊ गणेशन इशा फाऊंडेशनमध्ये २००७ पासून काम करत होता. मात्र मार्च २०२३ रोजी तो कोईम्बतूरच्या संस्थेतून अचानक बेपत्ता झाला. या खटल्यात तमिळनाडू पोलीस प्रतिवादी असून त्यांनी उच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार २०१६ पासून इशा फाऊंडेशनमधून अनेक लोक बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. अतिरिक्त सरकारी वकील ई. राज तिलक यांनी पोलिसांची बाजू न्यायालयासमोर मांडली. ते म्हणाले की, या प्रकरणांचा तपास सुरू आहे. मात्र बेपत्ता झालेल्या काही जणांपैकी अनेक लोक परत आलेले आहेत, पण त्यांची माहिती सध्या आमच्याकडे उपलब्ध नाही.

अध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर तातडीची मेंदू शस्त्रक्रिया

उच्च न्यायालयाने पोलिसांच्या या माहितीची दखल घेतली असून या प्रकरणाचा सखोल तपास करून १८ एप्रिलपर्यंत सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले.

थिरुमलाई यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, इशा फाऊंडेशनमधून मला कळविण्यात आले की, गणेशन दोन दिवसांपासून आढळून आलेला नाही. यानंतर ५ मार्च २०२३ रोजी इशा फाऊंडेशनच्या दिनेश राजा यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. ज्याचे रुपांतर बेपत्ता एफआयआरमध्ये करण्यात आले. थिरुमलाई यांनी हॅबियस कॉर्पस याचिका दाखल करून त्यांच्या भावाला तातडीने शोधण्याची विनंती न्यायालयाला केली.

पोलिसांचा दावा खोटा आणि बिनबुडाचा

बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनुसार गणेशन याने २८ फेब्रुवारी २०२३ रोजी इशा फाऊंडेशन केंद्राबाहेर पडल्याचे आढळून आले. गणेशनने पोंडी मंदिरात जाण्यासाठी रिक्षा पकडली आणि त्यानंतर तो बेपत्ता झाला. संस्थेतून सहा लोक बेपत्ता झाल्याच्या दाव्यावर बोलताना इशा फाऊंडेशनने नापसंती व्यक्त केली. ही माहिती पूर्णपणे खोटी असल्याचे निवेदन इशा फाऊंडेशनने दिले आहे.

कोण आहे सद्गुरु जग्गी वासुदेव?

सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया पार पडली. शस्त्रक्रियेनंतर सद्गुरु यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढण्यात आला असून आता त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगितले जाते. जग्गी वासुदेव हे अध्यात्मिक गुरु, योगी, लेखक आणि कवी आहेत. तसंच गूढ लेखनाकडे त्यांचा कल आहे. जगभरात त्यांचे लाखो अनुयायी आहेत. इशा फाऊंडेशन नावाच्या संस्थेचे ते संस्थापकही आहेत. इशा फाऊंडेशन हे भारतासह संयुक्त राष्ट्र, अमेरिका, इंग्लंड, लेबनॉन, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये योगसाधना शिकवण्याचं काम करते. 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six went missing from sadhgurus isha foundation since 2016 police to madras high court kvg