प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सद्गुरुंच्या मेंदूवर तातडीची शस्त्रक्रिया पार पडली आहे. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना डोकेदुखीचा त्रास जाणवत होता आणि उलट्या होत होत्या. १७ मार्च या दिवशी त्यांना दिल्लीतल्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंत डॉ. विनीत सुरी यांनी त्यांची तपासणी केली आणि एमआरआय करण्याचा सल्ला दिला. एमआरआयच्या अहवालात त्यांच्या मेंदूला सूज आल्याचं आणि रक्तस्त्राव झाल्याचं आढळलं होतं. ज्यानंतर ही शस्त्रक्रिया पार पडली आहे. ANI ने हे वृत्त दिलं आहे.

शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर सद्गुरुंची पहिली प्रतिक्रिया

“अपोलो रुग्णालयात माझ्या मेंदूवर शस्त्रक्रिया पार पडली. माझ्या मेंदूमध्ये डॉक्टरांनी गाठ किंवा काही सापडतं आहे का? हे तपासलं पण त्यांना ते आढळून आलं नाही. त्यानंतर माझी शस्त्रक्रिया पार पडली. माझ्या मेंदूला कुठलीही इजा झालेली नाही” असं सद्गुरुंनी हसत हसत सांगितलं.

आज पार पडली शस्त्रक्रिया

आज (२० मार्च) दिल्लीतील अपोलो रुग्णालयातील डॉ. विनित सुरी, डॉ. प्रणव कुमार, डॉ. सुधीर त्यागी आणि डॉ. एस. चटर्जी या डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर सद्गुरु यांचा व्हेंटिलेटर सपोर्टही काढण्यात आला असून त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. नरसिंहन यांच्या अपडेटनुसार, शस्त्रक्रियेनंतर त्यांचा मेंदू, शरीर आणि महत्त्वाच्या पॅरामीटर्समध्ये चांगल्या सुधारणा होत आहेत.

जगभरात सद्गुरू जग्गी वासुदेव हे त्यांच्या प्रवचनांसाठी प्रसिद्ध

जग्गी वासुदेव हे अध्यात्मिक गुरु, योगी, लेखक आणि कवी आहेत. तसंच गूढ लेखनाकडे त्यांचा कल आहे. जगभरात त्यांचे लाखो अनुयायी आहेत. इशा फाऊंडेशन नावाच्या संस्थेचे ते संस्थापकही आहेत. इशा फाऊंडेशन हे भारतासह संयुक्त राष्ट्र, अमेरिका, इंग्लंड, लेबनॉन, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये योगसाधना शिकवण्याचं काम करते. सद्गुरुंनी आत्तापर्यंत ८ भाषांमध्ये १०० हून अधिक पुस्तकंही लिहिली आहेत. जग्गी वासुदेव यांचा जन्म ५ सप्टेंबर १९५७ या दिवशी कर्नाटकच्या मैसूर या शहरात झाला. निसर्गाची त्यांनी लहानपणापासूनच ओढ होती. ध्यानधारणेचीही आवड त्यांच्यात निर्माण झाली. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी योगाभ्यास सुरु केला. राघवेंद्र दास हे त्यांचे योग गुरु होते.