केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा स्कुटी चालवतानाचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर बराच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार गाडीच्या मागच्या सीटवर हातात तिरंगा घेऊन बसलेल्या दिसत आहेत. ‘भारती ताईंना त्यांच्या कार्यालयात सोडत आहे’, असे स्मृती इराणी या व्हिडिओत सांगत आहेत. इराणींनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. स्मृती इराणींनी लाल साडी तर भारती पवारांनी सलवार कुर्ता परिधान केला आहे. दिल्लीच्या रस्त्यांवर फिरताना सुरक्षिततेची काळजी घेत दोघींनीही हेल्मेट घातले आहे.

या व्हिडिओला आत्तापर्यंत ७० हजारांहून अधिक जणांनी लाईक केले आहे. ‘इरानी बारिक झाल्या असून अत्यंत फीट दिसत आहेत’ अशी कमेंट करत चित्रपट निर्माती एकता कपूर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. अभिनेत्री दिव्या सेठनेही इराणींचं कौतुक केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ जुलैला ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाची घोषणा केली आहे. या अंतर्गत २ ते १५ ऑगस्टदरम्यान समाजमाध्यमांवरील खात्यांवर तिरंग्याचे छायाचित्र ‘प्रोफाईल पिक्चर’ म्हणून ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या उपक्रमाला व्यापक लोक चळवळीचे रुप येत असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. येत्या १५ ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाअंतर्गत प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहनही सरकारकडून करण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात स्मृती इराणींनी त्यांचा मुलगा जोहर याच्या पदवीदान समारंभाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. ‘हा क्षण नवीन शक्यतांच्या आगमनाची सुरवात आहे. तुझ्या क्षमतेनुसार स्वप्नांचा पाठलाग कर, जबाबदारीने आणि प्रेमाने जग’, अशा आशयाची पोस्ट लिहून लेकावर गर्व असल्याचे स्मृती इराणी या पोस्टमध्ये म्हणाल्या होत्या.