दक्षिण आफ्रिकेच्या ज्युनिअर स्क्वॅश संघाचे प्रशिक्षक ग्रॅहम प्रायर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. चेन्नईत सुरु असलेल्या ज्युनिअर स्क्वॅश चॅम्पियनशीप स्पर्धेदरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनूसार, दक्षिण आफ्रिका विरुद्ध सिंगापूर यांच्यातील सामना झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ आपल्या बसमधून हॉटेलकडे रवाना होत होता. यादरम्यान प्रायर यांना अचानक त्रास व्हायला लागला आणि ते रस्त्यातच कोसळले. सुदैवाने स्पर्धेच्या ठिकाणी तैनात असलेल्या रुग्णवाहिकेने प्रायर यांना स्थानिक रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र रुग्णालयात पोहचेपर्यंत त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

या घटनेनंतर स्पर्धेच्या आयोजकांनी दक्षिण आफ्रिकेच्या दूतावासाशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. ग्रॅहम प्रायर यांचं पार्थिव त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जात आहे. मुळचे झिम्बाब्वेमध्ये जन्मलेल्या प्रायर यांच्या परिवारांनी दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये स्थलांतर केलं होतं. झिम्बाब्वेचं दोन महत्वाच्या स्क्वॅश स्पर्धांमध्ये प्रतिनिधीत्व केल्यानंतर प्रायर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला प्रशिक्षण देत होते.