एक्स्पेस वृत्त,नवी दिल्ली : श्रीलंकेतील एका ५०० मेगावॉट क्षमतेच्या ऊर्जानिर्मिती प्रकल्पाचे कंत्राट गौतम अदानी समूहाला देण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्यावर कथितरित्या दबाव आणला, असा आरोप श्रीलंका प्रशासनातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने केला, पण त्यानंतर त्याने हे विधान मागे घेतले. त्याचप्रमाणे अध्यक्ष गोताबया यांच्या कार्यालयातूनही या आरोपाचे स्पष्टपणे खंडन करण्यात आले. 

मन्नार जिल्ह्यातील प्रकल्पाबाबत हा आरोप करण्यात आला. सीलोन वीज मंडळाचे अध्यक्ष एमएमसी फर्दिनांदो यांनी शुक्रवारी कोलंबोत  कायदे मंडळाच्या समितीपुढे बोलताना असा दावा केला होता की, अध्यक्ष राजपक्षे यांच्याशी आपण चर्चा करीत असताना ते म्हणाले होते की, हा प्रकल्प अदानी समूहाला देण्यासाठी मोदी यांनी त्यांच्यावर दबाव आणला आहे. त्यानंतर राजपक्षे यांनी हा प्रकल्प अदानी समूहास देण्यास सांगितले.

पण, फर्दिनांदो यांनी नंतर सांगितले की, भावनेच्या भरात मी हे बोलून गेलो.  

खुलाशादाखल राजपक्षे यांनी तातडीने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, मन्नार पवनऊर्जा प्रकल्पाचे काम एखाद्या विशिष्ट व्यक्ती किंवा कंपनीला देण्यासाठी मी माझ्या अधिकाराचा वापर केल्याचा आरोप मी स्पष्टपणे फेटाळून लावत आहे. श्रीलंकत सध्या तीव्र वीजटंचाई असली तरी असे प्रकल्प होताना कोणत्याही प्रकारे अयोग्य प्रभाव टाकला जाणार नाही. 

काही दिवसांपूर्वीच श्रीलंका सरकारने अशा प्रकल्पांसाठी स्पर्धात्मक निविदा मागविण्याची अट शिथील केली होती. भारत सरकार किंवा अदानी समूहाकडून तातडीने  प्रतिक्रिया देण्यात आली नाही.