तिसरीतील एक चतुर्थांश विद्यार्थीच दुसरीतील पुस्तके वाचू शकतात… पाचवीतील निम्मेच विद्यार्थी तिसरीतील पुस्तके वाचू शकतात…जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱया भारताच्या शैक्षणिक क्षेत्रातील ही चिंताजनक स्थिती समोर आली आहे एका सर्वेक्षणातून. वार्षिक शैक्षणिक सद्यस्थिती अहवालामध्ये देण्यात आलेली माहिती सर्वसामान्यांचे डोळे उघडवणारी आहे.
विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून विविध उपक्रम राबविले जात असतानाही सहा ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य आणि गणितातील प्रगती चिंताजनक असल्याचे देशभरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. दहाव्या वार्षिक शैक्षणिक सद्यस्थिती अहवालामध्ये याबद्दल सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खासगी शाळांमध्ये भरती करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींनुसार आवश्यक सुविधा पुरविण्यामध्येही शाळा जागरूक असल्याचे दिसून आले. मात्र, या सगळ्यातही वाचन कौशल्य आणि गणित आत्मसात करण्याची स्थिती चिंताजनक आहे. सातवीत शिकणाऱया २५ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीतील पुस्तके नीट वाचता येत नसल्याचेही सर्वेक्षणात दिसून आले. वाचनकौशल्ये आत्मसात करण्यातील विद्यार्थ्यांची प्रगती गेल्या काही वर्षांमध्ये उत्तमपासून सर्वसाधारण या दिशेने जात असल्याचे दिसून आले. त्यातही महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, आसाम आणि छत्तीसगढ या राज्यांमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये ही घसरण लक्षणीय आहे. शिक्षण हक्क कायद्यानंतर सहा ते १४ वयोगटातील मुला-मुलींचे शाळेत
जाण्याचे प्रमाण वाढले असले तरी १५-१६ वर्षांच्या मुला-मुलींचे शिक्षणापासून दुरावण्याचे प्रमाणही वाढले असल्याची माहिती मिळाली आहे. या वयोगटातील १५.९ टक्के मुले आणि १७.३ टक्के मुली सध्या शिक्षणापासून वंचित आहेत.