दिल्ली : कोणत्याही देवतेचे जन्मस्थान कायद्यानुसार एखादी व्यक्ती किंवा पक्षकार म्हणून कसे गृहीत धरणार, असा प्रश्न गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित   केला.

राजकीयदृष्टय़ा संवेदनशील असणाऱ्या अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादाच्या प्रकरणात ‘राम लल्ला विराजमान’ यांना  सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्न  विचारला.

गेले तीन दिवस अयोध्या खटल्याची सुनावणी होत आहे. सगळ्या कार्यालयीन कामाकाजाच्या दिवशी या खटल्याची सुनावणी घेण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. यापूर्वी ही सुनावणी मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशीच होत असे.

हिंदू देव-देवतांना कायदेशीरदृष्टय़ा एक व्यक्ती म्हणून ग्राह्य़ धरता येते. जे संस्था आणि संपत्तीचे मालक असू शकतात. तसेच ते मालमत्ता आणि संस्थांचे मालक म्हणून ग्राह्य़ धरले जाऊ शकतात. मात्र एखाद्या देवतेचे जन्मस्थान ही स्वतंत्र्य व्यक्ती म्हणून कसे ग्राह्य़ धरणार, असा प्रश्न सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी वरिष्ठ वकील  के. पारासरन यांना केला.

यावर उत्तर देनाना पारासरन म्हणाले की, हिंदू धर्मात उपासना करण्यासाठी मूर्तीची गरज असतेच असे  नाही, तर स्थळ पवित्र असण्याची गरज आहे. हिंदू धर्मात सूर्य आणि नदीचीही पूजा केली जाते, म्हणून जन्मस्थळाला व्यक्ती म्हणून गृहीत धरता येऊ शकते, असा युक्तिवाद  त्यांनी केला.  जन्मस्थळाचे महत्त्व पटवून देण्यासाठी पारासरन यांनी ‘जननी जन्मभूमी च स्वर्गादपि गरियसि’ या संस्कृत श्लोकाचा आधार घेतला.