परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज्य सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. मूत्रपिंड निकामी झाल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी बुधवारी ट्विटरवरुन दिली होती. यानंतर सुषमा स्वराज यांच्या प्रकृतीसाठी देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून सुषमा स्वराज यांच्यासाठी प्रार्थना केली आहे. पाकिस्तानमधूनही स्वराज यांच्यासाठी प्रार्थना करण्यात येत आहेत.

सुषमा स्वराज यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, म्हणून अनेकांनी प्रार्थना करण्यासाठी समाज माध्यमांचा आधार घेतला आहे. मोठ्या नेत्यांपासून सामान्य माणसांपर्यंत अनेकांनी सुषमा स्वराज यांची प्रकृती सुधारावी, म्हणून प्रार्थना केली आहे. ‘सुषमा स्वराज यांच्यासारख्या देशभक्त व्यक्तीसाठी मी माझे मूत्रपिंड देण्यास तयार आहे. तुम्ही माझे मूत्रपिंड घ्या,’ असे एका ट्विटर वापरकर्त्याने म्हटले आहे. तर दुसऱ्या एक ट्विटर वापरकर्त्याने ‘माझा रक्तगट ओ पॉझिटिव्ह आहे. काही गरज असेल तर तुमच्या लहान भावाला लक्षात ठेवा,’ असे ट्विट केले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयावरुन अनेकांनी सुषमा स्वराज यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला. ‘तुमची प्रकृती लवकरच ठिक होईल. मात्र आज तुमच्यासारखेच अनेक लोक रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालय प्रशासन त्यांच्याकडून ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा घ्यायला तयार नाही,’ असे एका ट्विटर वापरकर्त्याने म्हटले आहे.

बुधवारी सकाळी सुषमा स्वराज यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरुन त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली. ‘मूत्रपिंड निकामी झाल्याने मी एम्स रुग्णालयात उपचार घेत आहे. सध्या मी डायलेसिसवर आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी तपासण्या सुरू आहेत. देवाचा आशीर्वाद माझ्यावर कायम असावा,’ असे ट्विट स्वराज यांनी केले आहे.

सुषमा स्वराज यांच्याकडे अनेक लोक ट्विटरच्या माध्यमातून मदत मागतात. स्वराज यांनी अनेक गरजूंना ट्विटरच्या माध्यमातून मदत केली आहे. मोदींच्या मंत्री मंडळातील काहीजण समाज माध्यमांचा अत्यंत प्रभावी वापर करतात. या मंत्र्यांमध्ये सुषमा स्वराज यांचा समावेश आहे.