ललित मोदी प्रकरणावरून विरोधकांच्या टीकेच्या कचाट्यात सापडलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटच्या प्रोफाईलमधून अचानक हटविण्यात आलेला परराष्ट्र मंत्रीपदाचा उल्लेख अखेर पूर्ववत करण्यात आला आहे. स्वराज यांच्या ट्विटर अकाऊंटच्या प्रोफाईलमधील माहितीतून परराष्ट्र मंत्रीपदाचा उल्लेख हटविण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला होता. ट्विटरवर याची जोरदार चर्चा देखील सुरू झाली होती. एवढेच नव्हे, तर परराष्ट्र मंत्रालयाचा हॅशटॅग देखील टॉप ट्रेंडमध्ये होता. हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर बुधवारी सायंकाळी स्वराज यांच्या ट्विटर प्रोफाईलमध्ये दुरूस्ती करण्यात आली आणि परराष्ट्र मंत्रीपदाचा उल्लेख पूर्ववत करण्यात आला. दरम्यान, आर्थिक गैरव्यवहारांचा आरोप असलेले ललित मोदी यांना सुषमा स्वराज यांनी मदत केल्याचे आयते कोलीत विरोधकांच्या हाती सापडल्याने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधी पक्षांनी स्वराज यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये विरोधकांनी सलग दुसऱया दिवशी गोंधळ घातल्याने दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.  पक्षश्रेष्ठींनी सुषमा स्वराज यांची पाठराखण केली असली तरी स्वराज यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन परराष्ट्र मंत्री हा उल्लेख काढून टाकण्यात आल्याने विविध चर्चांना उधाण आले होते.

sushma_swaraj_twitter