संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये बोलताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला खडे बोल सुनावले. आज दहशतवादाचा राक्षस जगाच्या प्रत्येक देशापर्यंत पोहोचला आहे. भारत कित्येक वर्षांपासून दहशतवादाची झळ सोसतोय. महत्वाचं म्हणजे दहशतवादाचे हे आव्हान कुठल्या दूरच्या देशामुळे नव्हे तर शेजारी देशामुळे निर्माण झाले आहे. हा देश दहशतवाद पसरवण्यातच नव्हे तर दहशतवादाचे आरोप फेटाळून लावण्यातही माहीर आहे अशी बोचरी टीका स्वराज यांनी केली.

अमेरिकेवर ९/११ हल्ला करणारा ओसामा बिन लादेन अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू होता. अमेरिकेने आपल्या सैन्य क्षमतेच्या बळावर पाकिस्तानात घुसून लादेनला संपवले पण हे सत्य समोर आल्यानंतर आपण काही गुन्हा केलाय असे पाकिस्तानला वाटत नव्हते. अजूनही तसेच सुरु आहे. ९/११चा मास्टर माईड मारला गेला पण मुंबईत २६/११ चा हल्ला घडवणारा हाफिज सईद पाकिस्तानात मोकळा फिरतोय.

तिथे सभा, मोर्चे काढून भारताला धमकी देतोय या सगळयामध्ये चांगली बाब म्हणजे पाकिस्तानचा खरा चेहरा आता जगासमोर आले आहे असे स्वराज म्हणाल्या. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांचा गौरव केला जातोय असे त्या म्हणाल्या. आमच्याकडून चर्चेमध्ये अडथळा आणला जातो असा आरोप नेहमी पाकिस्तानकडून केला जातो. पण हे पूर्णपणे खोटे आहे. कुठलाही जटील प्रश्न, वाद चर्चेने सुटतो यावर आमचा विश्वास आहे. अनेकदा पाकिस्तान बरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण ही चर्चा रद्द झाली असेल तर त्याला पाकिस्तानचे वर्तन जबाबदार आहे असे स्वराज म्हणाल्या.

मागच्यावर्षी संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानने भारताकडून मानवी अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा एक फोटो दाखवला होता. पण हा फोटो दुसऱ्याच कुठल्यातरी देशातील होता. पाकिस्तानकडून नेहमीचे असे खोटे आरोप केले जातात तो त्यांच्या प्रचारतंत्राचा भाग आहे असे स्वराज म्हणाल्या.