अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील अध्यक्षीय प्रासादावर मंगळवारी तालिबान्यांनी शक्तिशाली हल्ला केला. प्रासादाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारावर सुमारे सहा स्फोट घडवून आणण्यात आले. त्याचबरोबर जवळपास पाऊणतास प्रवेशद्वाराजवळ गोळ्यांच्या फैरी झडत होत्या. काबूलमधील सर्वांत सुरक्षित ठिकाणावर आम्ही हल्ला करून दाखवला, असे तालिबानने म्हटले आहे.
तालिबानने केलेला हल्ला हा आत्मघाती होता. हल्ल्यानंतर अध्यक्षीय प्रासादाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारापासून धुराचे लोट मोठ्या प्रमाणात येत असल्याचे दिसत आहेत. आम्ही शत्रूला मारले, असा संदेश तालिबानने या हल्ल्यानंतर एसएमएसच्या माध्यमातून दिला. अफगाणिस्तानचे अध्यक्ष हामिद करझाई यांच्या पत्रकार परिषदेसाठी काही पत्रकार प्रासादाजवळ आले होते. त्यांनी या ठिकाणी सात ते आठ शक्तिशाली स्फोट झाल्याचे सांगितले.
अध्यक्षीय प्रासादाच्या परिसरातच अमेरिकेचा दूतावास असून, नाटोच्या सैन्याचे मुख्यालयही तिथेच आहे. त्यामुळेच तालिबानने या ठिकाणाला लक्ष्य केल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.