भारताच्या पाकिस्तानविषयक धोरणात सतत उलटसुलट बदल होत असल्याचा आरोप परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी फेटाळून लावला. पाकिस्तानभेटीबाबत संसदेत निवेदन करताना त्यांनी सांगितले की, पाकिस्तानशी पुन्हा चर्चा सुरू करण्याचा निर्णय हा विश्वासावर आधारित आहे व त्या देशाकडून काही प्रक्षोभक कारवाया होत असल्या तरी संवादात खंड पडू नये हा त्यामागचा उद्देश आहे. या भागातील शांतता व स्थिरतेसाठी दोन्ही देशांतील दरी भरून काढण्यासाठी र्सवकष संवादाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दहशतवादावरील चर्चेचे मुद्दे परराष्ट्र सचिवांऐवजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी हाताळावेत, असे ठरवण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक बँकॉक येथे अचानक झाली असली तरी त्यात कुठल्याही त्रयस्थ देशाचा संबंध नव्हता. उफा येथील संवादाची प्रक्रिया पुढे नेण्याचा त्यात उद्देश होता.
राज्यसभा व लोकसभेत स्वराज यांनी सांगितले की, पाकिस्तानने आता जो पुढाकार घेतला आहे त्याला आपण पाठिंबा देणे गरजेचे आहे. दहशतवाद व चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाही असे स्पष्ट केले.