हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर आता तेलुगू देसम पक्षाला (टीडीपी) पुन्हा एक हादरा बसला आहे. कुतबल्लपूर येथील तेलुगू देसम पक्षाचे आमदार के. पी. विवेकानंद गौड यांनी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) पक्षात प्रवेश केला आहे.
जनता टीआरएसबरोबर असल्याचे महापालिका निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे, आम्ही सर्वागीण विकास करावा अशी जनतेची इच्छा आहे, यापूर्वी आपण टीआरएस पक्षात काम केले आहे. त्या पक्षात असतानाही आम्ही जनतेच्या विकासासाठी अनेक योजनांवर काम केले. पक्ष बदलला असला तरी काम कायम राहणार असल्याचे गौड म्हणाले.
टीआरएसमध्ये प्रवेश करणारे गौड हे तेलुगू देसम पक्षाचे नवे नेते आहेत. यापूर्वी टी. श्रीनिवास यादव, टी. के. रेड्डी, जी. सायन्ना आणि एम. किशन रेड्डी या तेलुगू देसमच्या आमदारांनी टीआरएसमध्ये प्रवेश केला होता.