चौकशी समितीचा अहवाल

आग्रा येथील एका खासगी रुग्णालयातील कथित ‘मॉक ड्रिल’ची चौकशी करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने या रुग्णालयास निर्दोषत्व बहाल केले आहे. या मॉक ड्रिलदरम्यान करोना रुग्णांना करण्यात येणारा प्राणवायूचा पुरवठा बंद करण्यात आला होता आणि त्यामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाला या बाबतचा कोणताही पुरावा आढळला नाही, असेही पथकाने स्पष्ट केले आहे.

आपण रुग्णालयात मॉक ड्रिल केले आणि पाच मिनिटांसाठी रुग्णांना करण्यात येणारा प्राणवायूचा पुरवठा बंद केला, असे शहरातील श्री पारस रुग्णालयाचे मालक सांगत असतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आग्रा प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. प्राणवायूचा पुरवठा बंद केल्यानंतर २२ रुग्णांचे मृतदेह निळे पडण्यास सुरुवात झाली, असेही रुग्णालयाचे मालक डॉ. अरिंजय जैन हे सांगत असल्याचे व्हिडीओमधून स्पष्ट झाले होते.

मात्र मॉक ड्रिलदरम्यान पाच मिनिटांसाठी प्राणवायूचा पुरवठा बंद करण्यात आला होता आणि त्यामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाला असा कोणताही पुरावा आढळला नाही, असे पथकाने जिल्हा प्रशासनाला सादर केलेल्या चौकशी अहवालामध्ये म्हटले आहे. तथापि, २६-२७ एप्रिल या कालावधीत या रुग्णालयातील १६ रुग्णांचा सहव्याधी आणि अन्य कारणांमुळे मृत्यू झाला, असे पथकाने म्हटले आहे.

रुग्णालयाच्या मालकाची व्हिडीओ फीत व्हायरल झाल्यानंतर या रुग्णालयास टाळे लावण्यात आले आणि मालकाविरुद्ध  गुन्हा नोंदविण्यात आला होता.