दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्य़ात दहशतवाद्यांच्या एका गटाने रविवारी आपल्या ठार झालेल्या साथीदाराच्या अंत्यसंस्कारप्रसंगी हवेत बंदुकीच्या  फैरी झाडण्याता  प्रकार रविवारी घडला. एका रस्ते अपघाताचा तपास करण्यासाठी शनिवारी मिरबाझार भागात गेलेल्या पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला असता पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात फयाझ अहमद ऊर्फ सेठा हा दहशतवादी मारला गेला होता. त्याच्या अंत्यसंस्कारप्रसंगी ही घटना घडली.

अहमद याचे नाव उधमपूर दहशतवादी हल्ल्याशी जोडले गेल्यानंतर तो ऑगस्ट २०१५ पासून फरार होता. कालच्या हल्ल्यात ३ नागरिक आणि एक पोलीसही ठार झाला होता.शनिवारी फयाझच्या अंत्यसंस्कारात किमान ४ दहशतवादी हजर झाले आणि त्यांनी त्यांच्याजवळील एके रायफलींमधून हवेत गोळीबार करून घोषणा दिल्यानंतर हे दहशतवादी पळून गेले, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठार झालेल्या सेठा या दहशतवाद्यावर २ लाख रुपयांचे रोख इनाम होते आणि उधमपूर दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रात त्याचे नाव होते.

दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी शेजारच्या शोपियान जिल्ह्य़ात सुरक्षा दलांनी मोठी शोधमोहीम राबवल्यानंतर दोन दिवसांनीच ही घटना घडली आहे. मारल्या गेलेल्या साथीदाराच्या अंत्यसंस्कारात दहशतवाद्यांनी हजर राहण्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळात घडल्या असून त्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

काश्मीरमध्ये  ३४ वाहिन्यांवर कारवाई

श्रीनगर : जम्मू-काश्मीर सरकारने राज्यातील उपायुक्तांना ३४ दूरचित्रवाणी वाहिन्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. या वाहिन्यांत पाकिस्तानी व सौदी अरेबियाच्या वाहिन्यांचा समावेश असून त्या हिंसाचार भडकावित असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यात भर पडली आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला आक्षेपार्ह वाहिन्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सांगितले असून पाकिस्तानी व सौदी अरेबियाच्या बेकायदा वाहिन्यांसह एकूण ३४ वाहिन्यांचे प्रक्षेपण नियंत्रित करण्याचा आदेश दिला आहे.

बेकायदेशीर वाहिन्यांचे कार्यक्रम दाखवणे हे हिंसाचारास उत्तेजन देण्यासारखेच आहे असे गृहखात्याचे मुख्य सचिव आर. के. गोयल यांनी सांगितले. सर्व उपायुक्तांना या बेकायदेशीर वाहिन्यांवर  कारवाईचे आदेश दिले आहेत. गोयल यांनी सांगितले की, काही केबल ऑपरेटर बेकायदेशीर पद्धतीने काही वाहिन्यांचे कार्यक्रम दाखवित असून त्यांच्यावर काय कारवाई केली जात आहे ते सांगावे,  माहिती व प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी राज्याच्या मुख्य सचिवांशी बोलून त्यांना याबाबत आदेश देण्यास सांगितले आहे,  राज्य गृहखात्याने सौदी अरेबिया व पाकिस्तानातील ३४ वाहिन्यांची यादी तयार केली असून त्यात झाकिर नाईक याच्या पीस टीव्ही वाहिनीचा समावेश आहे. या चौतीस वाहिन्यांत पीस टीव्ही उर्दू व इंग्रजी, एआरवाय क्यूटीव्ही, मदनी चॅनेल, नूर टीव्ही, हादी टीव्ही, पैगाम, हिदायत, सौदी अल सुन्ना अल नबवियाह, सौद अल कुरान अल करीम, सेहार, करबाला टीव्ही, अहली बियत, टीव्ही, मेसेज टीव्ही, हम टीव्ही, एआरवाय डिजिटल एशिया, हम सितारे, एआरवाय जिंदगी, पीटीव्ही स्पोर्टस, एआरवाय म्युधिक, टीव्ही वन, एआरवाय मसाला, एआरवाय मसाला, एटीव्ही, जिओ न्यूद, एआरवाय न्यूज एशिया, अब तक न्यूद, वासेब टीव्ही, ९२ न्यूज, दुनिया न्यूज, सामना न्यूज, जिओ तेझ, एक्स्प्रेस न्यूद, एआरवाय न्यूज यांचा समावेश आहे.