पीटीआय, नवी दिल्ली

१९५० ते २०१५ या ६५ वर्षांत देशात हिंदू लोकसंख्या ७.८१ टक्क्यांनी घटली असून मुस्लिमांची संख्या ४३.१५ टक्क्यांनी वाढल्याचा अहवाल पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने प्रकाशित केल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचा अहवाल प्रकाशित करून धार्मिक फूट पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

भाकपचे सरचिटणीस डी. राजा आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी जनगणना न केल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली. जनगणना केली नाही, मात्र पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने धार्मिक लोकसंख्याबाबत प्रसिद्ध केलेले कार्यपत्र कलह निर्माण करणारे आहे. अशा प्रकारे धार्मिक कलह निर्माण करून मते मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे या दोन्ही नेत्यांनी सांगितले.

तेजस्वी यादव यांनी भाजप द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. २०२०-२१ मध्ये जनगणना होणार होती. मात्र ती आजपर्यंत झाली नाही… भाजपचा उद्देश फक्त देशातील जनतेची दिशाभूल करणे, द्वेष पसरवणे आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अजेंडा आहे आणि भाजपने देशातील जनतेला दहा वर्षे मूर्ख बनवले आहे आणि त्यांना पुन्हा तेच करायचे आहे, असा आरोप यादव यांनी केला.

हेही वाचा >>>भारत-मालदीव संबंधांचा विकास परस्पर हितसंबंध, संवेदनशीलतेवर आधारित; परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचे प्रतिपादन

डी. राजा यांनी अहवालाच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशात निवडणुका होत असताना पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने हा अहवाल का आणला? पंतप्रधान आधीच मुस्लिमांच्या नावावर लोकांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते गिरिराज सिंह यांनी या विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आणि या अहवालावरून काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशातील हिंदू लोकसंख्या कमी झाल्याचा आरोप केला. ‘‘१९४७ मध्ये ८८ टक्के हिंदू लोकसंख्या होती, आता आपण ७० टक्के आहोत. मुस्लीम आठ टक्के होते, आता सरकारी आकडे सांगतात की ते १५ ते १६ टक्के आहेत, मी म्हणेन की ते २० टक्के आहेत. काँग्रेसने या देशाला ‘धर्मशाळा’ बनवले. १९७१ मध्ये आलेल्या बांगलादेशी घुसखोरांनी भारत आणि बिहारला रोहिंग्या, बांगलादेशींचे अभयारण्य बनवले, त्यांचे मतपेढीत रूपांतर केले. आता ते मागच्या दाराने आरक्षण देत आहेत,’’ असा आरोप सिंह यांनी केला.

अहवाल काय सांगतो?

● शेअर ऑफ रिलिजियस मायनॉरिटीज : अ क्रॉस-कंट्री अॅनालिसिस (१९५०-२०१५)’ या नावाने पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने कार्यपत्र प्रसिद्ध केले आहे.

● या कार्यपत्रानुसार १९५० ते २०१५ दरम्यान हिंदू लोकसंख्या ७.८२ टक्क्यांनी घटली. (८४.६८ टक्क्यांवरून ७८.०६ टक्क्यांवर)

● १९५० मध्ये मुस्लीम लोकसंख्या ९.८४ टक्के होती. २०१५ मध्ये वाढून १४.०९ टक्के झाली. त्यांची लोकसंख्या ४३.१५ टक्क्यांनी वाढली.

● ख्रिाश्चन लोकसंख्येचा वाटा २.२४ टक्क्यांवरून २.३६ टक्क्यांवर पोहोचला. त्यांच्या लोकसंख्येत ५.३८ टक्क्यांनी वाढ.

● जैनांची लोकसंख्या १९५० मध्ये ०.४५ टक्के होती. २०१५ मध्ये ०.३६ टक्क्यांवर आली.

● शीख लोकसंख्या १९५० मध्ये १.२४ टक्के होती. २०१५ मध्ये १.८५ टक्क्यांपर्यंत वाढली. त्यांच्या लोकसंख्येत ६.५८ टक्क्यांनी वाढ.

● भारतातील पारशी लोकसंख्या ८५ टक्क्यांनी घसरली. १९५० मध्ये ती ०.०३ टक्के होती. २०१५ मध्ये ०.००४ टक्के.