आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, तुमच्या वादग्रस्त विधानांमुळे पक्षाला त्रास होतोय. विनाकारण माध्यमांना बातम्यांसाठी मसाला देऊ नका, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या आमदार आणि खासदारांना खडसावले. मोदींनी रविवारी नमो अॅपवरुन पक्षाच्या नेत्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी या सूचना केल्या आहेत.

मोदी म्हणाले, पत्रकारांसमोर कोणत्याही प्रकारे वादग्रस्त प्रतिक्रिया देऊ नका. आपण चुका करतो आणि माध्यमांना मसाला देतो. आपल्याला समोर कॅमेरा दिसला की लगेच प्रतिक्रिया द्यायला लागतो. जसे की आपण कोणी मोठी महान आणि तज्ज्ञ व्यक्ती आहोत. याच नकळत दिलेल्या प्रतिक्रियांचा माध्यमे वापर करुन घेतात. यात माध्यमांची चूक नसून तुमचीच चूक आहे.

दरम्यान, मोदींनी आपल्या नेत्यांच्या कामाचे मोठे कौतुकही केले. ते म्हणाले, पक्ष नेत्यांमुळेच भाजपा जनतेशी थेट जोडली गेली आहे. त्यामुळे पक्षात नवी ऊर्जा संचारली आहे. यावेळी मोदींनी विकासाच्या मुद्द्यावरून प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या फायद्या तोट्यांवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारची ही योजना कशी देशाच्या विकासामध्ये आर्थिक स्तरावर मदत करीत आहे. मोदींनी यावेळी ग्रामीण भागांचे चित्र बदलणे आणि शेतकऱ्यांना फायद्याबाबतही चर्चा केली.

मोदींच्या मतानुसार, कॅमेरा समोर दिसताच पक्षाच्या नेत्यांनी घटनांचे विश्लेषण करण्यापासून दूर रहावे. स्वतःवर संयम ठेवावा. जबाबदार व्यक्तीनेच असा विषयांवर भाष्य करावे. जर सर्वच जण त्या विषयावर बोलायला लागले तर मुद्द्यांमध्ये बदल होत राहील. अशा वेळी थेट देश, पक्ष आणि त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत प्रतिमेचे नुकसान होईल.