चित्रकूट: येथील पुरातन अशा बालाजी मंदिरातील मूर्ती चोरल्यानंतर आपल्याला ‘भयानक स्वप्ने’ पडल्याचे सांगून चोरांनी चोरलेल्या अष्टधातूंच्या १४ मूर्ती मंदिराच्या पुजाऱ्याला परत आणून दिल्याची घटना घडली.

‘कोटय़वधी रुपये किमतीच्या अष्टधातूंच्या १६ मूर्ती तरौन्हा येथील पुरातन बालाजी मंदिरातून ९ मे च्या रात्री चोरीला गेल्या होत्या. या संबधात पुराजी महंत रामबालक यांनी अज्ञात चोरांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता’, असे सदर कोतवाली कारवीचे ठाणेदार राजीव कुमार सिंह यांनी सांगितले. ‘चोरलेल्या १६ मूर्तीपैकी १४ मूर्ती रहस्यमयरीत्या महंत रामबालक यांच्या घराजवळ एका पोत्यात सापडल्या. या पोत्यासोबत एक पत्र होते. आपल्याला रात्री भयंकर स्वप्ने पडत असल्यामुळे भीती वाटत असल्याने आपण या मूर्ती परत करत आहोत असे चोरांनी पत्रात लिहिले होते’, अशी माहिती सिंह यांनी दिली. सध्या अष्टधातूंच्या या १४ मूर्ती कोतवालीत जमा करण्यात आल्या आहेत.