स्वतंत्र तेलंगणा राज्याची घोषणा करण्याबाबत नव्याने मुदत जाहीर करण्यास केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी स्पष्ट नकार दिला. या बाबत चर्चा सुरू आहे, सल्लामसलतीची प्रक्रिया सुरू आहे, असे ते म्हणाले.
स्वंतत्र तेलंगणा राज्यनिर्मितीच्या मागणीबाबतचा निर्णय रविवारी पुढे ढकलण्यात आला. या संदर्भात अधिक सल्लामसलत करण्याची गरज असल्याने त्याला काही कालावधी लागेल, असे काँग्रेस आणि केंद्र सरकारने म्हटले आहे. स्वतंत्र तेलंगणाबाबत सरकार एका महिन्यात घोषणा करील, असे शिंदे यांनी २८ डिसेंबर रोजी जाहीर केले होते. ही मुदत रविवारी संपुष्टात आली. या संदर्भात चर्चेची प्रक्रिया सुरू असल्याने त्यासाठी काही कालावधी लागेल, असे गृहमंत्री म्हणाले.
काँग्रेसचा विरोध नाही – चाको
स्वतंत्र तेलंगण निर्मितीचा निर्णय जलद गतीने घेतला जाईल, असे काँग्रेसने स्पष्ट केले. तेलंगण राज्याची निर्मिती करण्यास काँग्रेसचा विरोध नाही. या मुद्दय़ावरील निर्णयाची प्रक्रिया सुरू आहे. परंतु यासंबंधी काही औपचारिक बाबींची पूर्तता अद्याप बाकी आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते पी. सी. चाको यांनी सांगितले.