समाज माध्यमांच्या संकेतस्थळांवर हल्ली एक रेडा चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. हे कसं शक्य आहे, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. हा कोणी सामान्य रेडा नसून याचं वार्षिक उत्पन्न ५० लाख रूपये, तर किंमत ७ कोटी इतकी आहे. हैदराबादमध्ये दर वर्षी ‘सरदार उत्सव मेला’ हा रेड्यांचा उत्सव साजरा करण्यात येतो. हैदराबादमधील यादव समाजाद्वारे दिवाळीच्या काळात रेड्यांचा हा उत्सव आयोजित केला जातो. या उत्सवाला दुन्नापोथुला पांडुगा नावानेदेखील ओळखले जाते. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणाऱ्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी भारतातील अनेक ठिकाणाहून स्पर्धक आपला रेडा घेऊन येतात. ज्यात या सात कोटी किंमतीच्या रेड्याचादेखील सहभाग असतो.

आपल्या मालकासाठी हा रेडा उत्पन्नाचे चांगले साधन बनला आहे. ‘युवराज’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या रेड्याचे वीर्य विकून हरियाणास्थित रेड्याचे मालक करमवीर सिंह दरवर्षी ५० लाखाच्या आसपास कमाई करतात. या रेड्याच्या वीर्याला पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह अन्य अनेक राज्यांमधून मागणी असल्याचे समजते. भारतात आढळून येणाऱ्या सर्वात चांगल्या प्रजातीचा हा रेडा असून, ५ फूट ९ इंच उंच आणि १४ क्विंटल वजनाच्या युवराजला करमवीरने पंजाब कृषी मेळाव्यात विकत घेतला होता.