७५व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना संबोधित करत रविवारी भाषण केलं. यावेळी त्यांनी देशातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची आठवण करुन दिली. आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य सेनानी मातंगिनी हाजरा या आसामच्या असल्याचा उल्लेख केला होता. मातंगिनी हाजरा या पश्चिम बंगालच्या मेदिनापूर येथील आहे. यावरुन तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदींना इतिहासाचे फारसे ज्ञान नाही आणि त्यांनी या चुकीच्या उल्लेखाबाबत माफी मागितली पाहिजे असे तृणमूलने म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर तृणमूल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना इतिहासाचे फारसे ज्ञान नाही आणि त्यांनी बंगालचे स्वातंत्र्य सेनानी मातंगिनी हाजराचे आसामचे रहिवासी म्हणून वर्णन केल्याबद्दल माफी मागितली पाहिजे असे म्हटले आहे. त्याचवेळी तृणमूल स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान झालेल्या चुकीबद्दल अनावश्यक वाद निर्माण करत असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

भाजपाने दावा केला आहे की बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही पूर्वी त्यांच्या भाषणांमध्ये अनेक चुका केल्या आहेत. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस कुणाल घोष म्हणाले की, पंतप्रधानांना इतिहासाचे फारसे ज्ञान नाही आणि केवळ नाट्यमय पद्धतीने लिखित भाषण वाचले. कुणाल घोष यांनी ट्विट करत, भाजपा, मातंगिनी हाजरा आसामच्या होत्या का? तुम्हाला इतिहासाचे ज्ञान नाही. तुमच्यात भावना नाही. तुम्ही फक्त एक लिहिलेले भाषण (तेही इतरांनी लिहिलेले) नाट्यमय पद्धतीने वाचले,” असे म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या भाषणाची एक क्लिप आपल्या ट्विटमध्ये पोस्ट करत घोष म्हणाले, “हा बंगालचा अपमान आहे. आपण माफी मागितली पाहिजे. आशा आहे की पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील तुमचे नेते देखील अशा चुकीचा निषेध करतील, असे म्हटले आहे. बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि नंदीग्रामचे भाजप आमदार सुवेंदू अधिकारी यांच्याकडे कुणाल घोष यांनी  उत्तर मागितले आहे.

कोण आहेत मातंगिनी हाजरा

वयाच्या ७२ व्या वर्षीही मातंगिनी हाजरा यांनी ब्रिटिशांना पूर्ण धैर्याने आणि उत्कटतेने तोंड दिले होते. वयाच्या १८ व्या वर्षी विधवा झालेल्या हजारा यांनी असहकार चळवळ आणि भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. या दरम्यान त्यांना तुरुंगातही जावे लागले. गांधीजींचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. १९३३ मध्ये सर जॉन अँडरसन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्यासमोर काळ्या झेंड्यासह त्या गेल्या तेव्हा मातंगिनी हाजरा प्रकाशझोतात आल्या.