आपल्या राज्यातील एका व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी संपूर्ण राज्य एकत्र आल्याचे चित्र दुर्मिळच. पण केरळसारख्या राज्याने मानवतेचे एक मोठे उदाहरण प्रस्थापित केले आहे. केरळच्या कोझिकोडमधील रहिवासी असलेल्या रहिमची मृत्यूदंडाची शिक्षा माफ करण्यासाठी जगभरातील केरळी लोक एकत्र आले आणि त्यांनी तब्बल ३४ कोटींची रक्कम लोकवर्गणीद्वारे जमा केली. केरळ छोटे राज्य असले तरी त्यांनी आपल्या माणसाला वाचविण्यासाठी दाखवलेली तत्परता ही कौतुकास्पद आहे. याबद्दल आता सोशल मीडियावरही चर्चा होत आहे. मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वपक्षीय राजकारणी, सेलिब्रिटी, व्यावसायिक, सामान्य माणूस रहिमला वाचविण्याच्या मोहिमेत सहभागी झाले होते.

प्रकरण काय आहे?

अब्दुल रहीम हा १८ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात आहे. रहीमच्या गाडीत १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर रहिमला त्याच्या मृत्यूस जबाबदार धरण्यात आले होते. २००६ साली हा प्रकार घडला. त्यानंतर २०१८ साली सौदी अरेबियाच्या न्यायालयाने रहिमला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. त्यानंतर सौदीच्या सर्वोच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम ठेवली. यानंतर मागच्यावर्षी रहिमच्या कुटुंबियांनी त्याच्या सुटकेच्या बदल्यात ३४ कोटींचा ब्लड मनी निधी देण्याची तयारी दर्शविली. हा निधी देण्यासाठी मध्यस्थांनी १६ एप्रिल पर्यंतची मुदत दिली होती.

मशिदीच्या आत ‘मोदी है तो मुमकीन है’च्या घोषणा, ‘अब की बार ४०० पार’चाही नारा, हे कुठे घडलं?

रहीम हा अतिशय गरिब कुटुंबातून येतो. सौदीमध्ये चालक म्हणून तो कार्यरत होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांना हे पैसे जमा करण्यात अडचण येत होती. मार्च महिन्यात कोझिकोडमधील रहिवाश्यांनी रहिमच्या सुटकेसाठी एक कार्य समिती स्थापन केली. रहिमसाठी लोकवर्गणीद्वारे पैसे गोळा करण्याचे ध्येय निश्चित केले. त्यासाठी ‘सेव्ह अब्दुल रहीम’, असे ॲप तयार केले. जेणेकरून लोकवर्गणीमध्ये पारदर्शकता राखली जाईल.

मागच्या आठवड्यापर्यंत केवळ पाच कोटी रुपये जमा होऊ शकले होते. त्यानंतर राजकारणी, सेलिब्रिटी आणि परदेशात राहणाऱ्या केरळी जनतेने सोशल मीडियावरून रहिमला वाचविण्याची हाक दिली आणि चमत्कार घडला. कासारगोड, तिरुवनंतरपुरम याठिकाणी प्रभात फेरी काढून मदतीचे आवाहन केले गेले, यातून १ कोटींचा निधी उभा राहिला. सर्व केरळी जनतेने काही आठवड्यातच आता ३४ कोटींचा मोठा निधी जमा केला आहे.

इस्रायलकडून युद्धात ‘एआय’चा वापर? इस्रायली आणि पॅलेस्टिनी पत्रकारांच्या अहवालात खुलासा

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी फेसबुक पोस्टवरून मदतीचे आवाहन केले होते. ही रक्कम गोळा झाल्यानंतर ते म्हणाले, “अब्दुल रहीमची सुटका करण्यासाठी जगभरातील केरळी नागरिक एकवटले. रहिमचा जीव वाचवून त्याच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी केरळच्या जनतेने घेतलेला हा पुढाकार प्रेमाचे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. केरळमध्ये बंधुभाव रुजलेला आहे, हे यातून दिसते, कोणतीही जातीयवादी विचारसरणी आमच्या बंधुभावाला खिंडार पाडू शकत नाही.”

ब्लड मनी म्हणजे काय?

सौदी अरेबियामध्ये खून केल्यास किंवा एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्यास मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात येते. या शिक्षेपासून सुटका करून घ्यायची असल्यास ब्लड मनीचा पर्याय आरोपीसमोर असतो. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्याच्या कुटुंबियांनी ब्लड मनीची रक्कम स्वीकारल्यास आरोपीला दोषमुक्त करण्यात येते. आरोपीला क्षमा करण्याच्या बदल्यात ही ब्लड मनीची रक्कम देण्यात येते.